दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा ३ डिसेंबरला वाढदिवस आहे. या दिवशी सातारा पोलीस दलाने ‘थोडा नवा पायंडा पाडू या… सामाजिक दायित्व अंगिकार करू या… दिव्यांगांच्या जीवनामध्ये आनंद फुलवू या…’ हा अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
याबाबत माहिती अशी, वाढदिवस म्हटलं की आनंदाचा क्षण. तो मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा व्हावा, अशी सर्वांचीच भावना असते. खरेतर वाढदिवस दरवर्षीच येत असतो. हा वाढदिवस काही लोक मोठ्या थाटामाटात समाजात जाहीरपणे साजरा करतात. मात्र, या समाजाचाच एक महत्त्वाचा भाग असणार्या दिव्यांग बांधवांच्या व्यथांचीदेखील आपल्याला जाणीव असायला हवी. आयुष्यभर खस्ता खाणार्या या दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंदाचे दोन क्षण आपण निश्चित आणू शकतो. त्यामुळे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस दलाच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या कार्याची ओळख निर्माण केलेल्या सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसाला हार-तुरे, पुष्पगुच्छ व कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देण्याऐवजी तुम्ही दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे त्यांना आवश्यक असणारे साहित्य भेट म्हणून द्या, आपले थोडेसे सहकार्य भावी पिढी घडविण्यास नक्कीच मैलाचा दगड ठरेल, शिवाय आपल्या सर्वांच्या सहकार्याने वाढदिवस खर्या अर्थाने सार्थकी लागेल. या आनंदाच्या सोहळ्याचा तुम्हीदेखील एक धागा होऊन सामाजिक दायित्व निभावल्याचा व कर्तव्यपूर्ती केल्याचा आनंद मिळवता येईल, सातारा पोलीस दलाने म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस दलाने आवाहन केले आहे की, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरीता हार-तुरे, बुके न आणता दिव्यांग बांधवांच्या मूलभूत गरजा म्हणजे व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, कुबडी, वॉकर, काठी, कानाच्या मशीन व इतर साहित्य आणावे. सदरील साहित्य हे गरजू दिव्यांग बांधवांना वितरित करणार येणार असल्याची माहिती पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली आहे.
ज्या लोकांना दिव्यांग व्यक्तींची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी वस्तू स्वरूपात मदत करावी. वस्तूबाबत माहिती हवी असल्यास सहा. फौजदार पवार (मोबा. ९९२३४८२०२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.