कोतवाल भरती : परीक्षा संपन्न; कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी होणार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यात २०२३ ची कोतवाल भरती सरळ सेवा परीक्षा रविवार, दि. ६ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. तालुक्यातील १७ पैकी १४ रिक्त सजातील कोतवाल पदांसाठी एकूण उमेदवारी १५२ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी १४७ उमेदवारांचे अर्ज लेखी परिक्षेसाठी पात्र झाले होते. सदर लेखी परीक्षा यशवंतराव चव्हाण ज्युनियर कॉलेज, फलटण येथे रविवार, दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी ११.०० ते १२.०० या वेळेत घेण्यात आली. परीक्षेस सर्वच्या सर्व १४७ उमेदवार उपस्थित होते.

परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सर्व वर्गात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय सर्व उमेदवारांना परीक्षा झाल्यानंतर लगेचच त्याच वर्गात त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून देण्यात आल्या. ज्या उमेदवारांनी गडबडीत त्यांच्या ओळखपत्रांच्या छायांकित प्रती अथवा काळे बॉलपेन सोबत आणले नव्हते, त्यांना प्रशासनाच्यावतीने ते केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले. अशा प्रकारे संपूर्ण परीक्षा संपूर्णतः पारदर्शक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.

परीक्षेदिवशीच (रविवारी) सायंकाळी उशिरापर्यंत पेपर तपासणी करून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार सर्वाधिक गुण मिळविणारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार झाली आहे. एकूण १४७ उमेदवारांमध्ये लक्ष्मण रत्नसिंह खराडे (तडवळे सजा) यांनी एकूण ९४ गुण म्हणजे तालुक्यात सर्वाधिक गुण मिळविले आहेत.

आता मूळ कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी येत्या बुधवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

गोखळी येथे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण होते. तेथे केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. तोही अपात्र ठरल्याने सदर जागा रिक्त राहिली आहे. उर्वरित १३ गावातील लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारे उमेदवार खालीलप्रमाणे असून यापैकी प्राथमिक निवड सूचितील पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याकामी येत्या २ दिवसांत तहसील कार्यालयात बोलविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा सदस्य सचिव कोतवाल निवड समिती डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.

सजानिहाय सर्वाधिक गुण मिळविणारे उमेदवार पुढीलप्रमाणे –

गिरवी – विवेक अतुलराज निकाळजे,
साठे – सिद्धार्थ सखाराम मोरे,
गुणवरे – कल्याणी अमोल खरात,
वाठार निंबाळकर – कविता अमर जगताप,
होळ – हारुण नजीर मुजावर,
कुसूर – सुरज सुभाष नरुटे,
राजुरी – काजल वैभव पवार,
हिंगणगाव – नामदेव माधव शिंदे,
तरडगाव – अक्षय चंद्रकांत गायकवाड,
वडले – कोमल शामराव खताळ,
खामगाव – सीमा निलेश भोसले,
तडवळे – लक्ष्मण रत्नसिंह खराडे.

धूळदेव येथे एकूण ४ उमेदवारांना समान गुण मिळाले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे –

मिलिंद तानाजी खरात,
अमोल भैरू चौगुले,
तृप्ती विशाल रत्नपारखी,
शुभम प्रदीप वेदपाठक


Back to top button
Don`t copy text!