फलटणच्या जोशी हॉस्पिटलमध्ये ‘रोबोटीक्स’ तंत्रज्ञानाने गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया; वैद्यकीय क्षेत्रात रोवला मानाचा तुरा


दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा.लि. संचालित ‘फलटण रोबोटीक सेंटर’ येथे २५ मे रोजी पहिल्यांदाच रोबोटीक्स तंत्रज्ञान वापरून दोन गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाल्या. रोबोटीक्स तंत्रज्ञान वापरणारे ‘फलटण रोबोटीक सेंटर’ हे पहिलेच आहे. रोबोटीक्स तंत्रज्ञानच्या वापरामुळे फलटणच्या वैद्यकीय क्षेत्रात जोशी हॉस्पिटलने मानाचा तुरा रोवला आहे. रोबोटीक्स तंत्रज्ञानच्या वापराची सर्व माहिती जोशी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. प्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसाद जोशी म्हणाले की, राज्यातल्या मोठ्या शहरातसुद्धा रोबोटीक तंत्रज्ञान काही मोजक्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ’तएङधड ठअड’ असे या रोबोटीक मशीनचे नाव आहे. जर्मन टेक्नॉलॉजी वापरून हे मशीन अमेरिकेत बनविले गेले आहे.

फलटणचे जोशी हॉस्पिटल गेल्या २३ वर्षांपासून खुबे, गुडघे, खांदे यांचे सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत आहे. आजपर्यंत ४ हजाराहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया जोशी हॉस्पिटलच्या डॉ. प्रसाद जोशी यांनी केल्या आहेत. भारतात तालुकास्तरीय पातळीवर एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच सर्जनने सर्वात जास्त सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यामुळे २०१७ साली डॉ. प्रसाद जोशी यांना ‘इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड’ने आणि २०१८ साली ‘भारत गौरव अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ साली सकाळी ग्रुपने ‘एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक’ हा किताब डॉ. प्रसाद जोशी यांना बहाल केला.

२०१२ पासून ‘ब्रेन लॅब’ या कंपनीचे ‘कॉम्प्युटर नेविगेशन’ हे सांधेरोपणासाठीचे लागणारे जर्मन उच्च तंत्रज्ञान जोशी हॉस्पिटल, फलटण येथे उपलब्ध आहे आणि तेे सुध्दा त्यावेळी भारतातील तालुकास्तरीय पहिलेच ‘नेविगेशन मशीन’ असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी नमूद केले.

रोबोटीक्सचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी डॉ. प्रसाद जोशी फ्लोरिडा (युएसए) येथील सर्वात मोठ्या रोबोटीक्स लॅबमध्ये प्रशिक्षण घेऊन आले आहेत. भारतातून त्यासाठी फक्त सात डॉक्टरांमधून डॉ. प्रसाद जोशी यांची निवड झाली होती.
सध्या जोशी हॉस्पिटल येथे सांधेरोपणासाठी सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, लांजा, गोवा, बांदा, बंगळूर, काशी, गया, अमेरिका आणि सौदी अरेबिया येथून पेशंट येत आहेत.

फलटण तालुक्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण असून तालुकास्तरावरील भारतातले हे पहिलेच रोबोटीक सेंटर असल्याने महाराष्ट्रात आणि भारतात फलटणचे नाव नक्कीच उज्ज्वल होईल, असा सार्थ विश्वास डॉ. जोशी यांनी बोलून दाखवला.

रोबोटीक्सचे तंत्रज्ञान हे सांधेदुखीच्या सर्व पेशंटना लवकर आणि दीर्घकाळ बरे राहण्यासाठी नक्कीच मदत करेल, असे सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

यावेळी जोशी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्राची जोशी, डॉ. शरद धायगुडे, प्रशासन अधिकारी अझहर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!