किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,मुंबई,दि.३०: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली.

मुलुंडच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुने आहे. त्यावेळी नील सोमय्या यांच्यावर खंडणीचा कोणताही गुन्हाही दाखल झाला नव्हता. मात्र, आज पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आहे. या चौकशीनंतर नील सोमय्या घरी परतले आहेत. मात्र, आगामी काळात पोलीस नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या हे सातत्याने सरकारच्या त्रुटी शोधून काढत असतात. त्यांनी गेल्या काही काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उकरून काढली आहेत. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या ‘ईडी’ चौकशीवेळी तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले होते. मध्यंतरी अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी थेट शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांना अंगावर घेतले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून किरीट सोमय्या यांना आम्हीही तुमचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला होता.

एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरु करु: शिवसेना

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारने तीन घोटाळे केल्याचा आरोप केला होता. या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश होता.

त्यावेळी शिवसेना आमदार अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर एकदाचे काय ते सर्व आरोप करून घ्यावेत. दिवाळीनंतर शिवसेना त्यांच्यावर कोणते आरोप करते ते पाहाच आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास तयार राहावे, असा गर्भित इशारा राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला होता.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका एकदा संपू द्या. आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य सापडलेले नाही. शिवसेना त्यांच्या प्रत्येक आरोपाची चिरफाड करेल, असे अनिल परब यांनी सांगितले होते.


Back to top button
Don`t copy text!