खंडाळा तालुक्याची खरीप हंगाम नियोजन सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२३ । सातारा । खरीप हंगामासाठी खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही. प्रत्येक कृषी सहाय्यक यांनी गावनिहाय खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना भाग्यश्री पवार -फरांदे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या.

        खंडाळा तालुक्याची खरीप हंगाम 2023 च्या नियोजन सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी बसवराज बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर,  तेजदिप ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी वाई, गजानन ननावरे, तालुका कृषी अधिकारी, खंडाळा,  विलास धायगुडे, कृषि अधिकारी, खंडाळा, वैभव क्षीरसागर, मंडळ कृषी अधिकारी खंडाळा, राजेंद्र रासकर, अध्यक्ष, खंडाळा तालुका निविष्ठा विक्रेता व खंडाळा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी खंडाळा तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेता केंद्र मालक व चालक उपस्थित होते.

यावेळी बसवराज बिराजदार यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, निविष्ठा विक्रेता व कृषी सेवा केंद्र चालक-मालक यांना खरीप हंगामात घेत असलेल्या ऊस, सोयाबीन, भात, उडीद, मूग या पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेत खंडाळा तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला गट यांना सहभागी होण्याविषयी आवाहन केले.

प्रथम सत्रात संग्राम पाटील, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी सोयाबीन व भात या पिकांबद्दल जमीन व्यवस्थापन ते काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.  किरणकुमार ओंबासे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी खंडाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र यांनी प्रसारित केलेल्या नवीन वाणाविषयी सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी खंडाळा गजानन ननावरे यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी संपतराव खंडागळे, माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी, खंडाळा यांनी या खरीप हंगाम नियोजन आढावा सभेमध्ये मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, गांडूळ खत व नाडेफ खत योजना याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी आशा व्यक्त केली. झगलवाडीचे सुनील विठ्ठल लिम्हण यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची जास्तीत जास्त अंमलबजावणी व्हावी व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मधील जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सर्व साधारण वर्गाचा समावेश करावा अशी भावना व्यक्त केल्या.

आढावा सभेस विलास धायगुडे, कृषी अधिकारी खंडाळा, वैभव शिरसागर, मंडळ कृषी अधिकारी खंडाळा, खंडाळा तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, खंडाळा तालुक्यातील सर्व प्रगतीशील शेतकरी, तालुक्यातील सर्व कृषी केंद्र मालक-चालक उपस्थित होते. प्रस्तावना वैभव शिरसागर, मंडळ कृषी अधिकारी खंडाळा यांनी केली व आभार प्रदर्शन  समीर चव्हाण, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक खंडाळा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!