
छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाईराजे यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्यानिमित्त बुलढाण्यातील करवंड येथे आयोजित महोत्सवात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या पुनरुज्जीवनाची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
स्थैर्य, सातारा / करवंड (बुलढाणा) : छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाईराजे यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे आयोजित “ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६” हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. करवंड येथे महाराणी गुणवंताबाई यांचे भव्य स्मारक उभारण्यासह येथील सर्व बुरुज व राजवाड्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली.
मान्यवरांची आणि वंशजांची विशेष उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार धीरज लिंगाडे, अनिकेत राजे निंबाळकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर उपस्थित होत्या. तसेच, महाराणी गुणवंताबाई इंगळे यांचे वंशज हरिचंद्र प्रताप रुद्र इंगळे आणि शकीलाबाई हरिचंद्र इंगळे यांची उपस्थिती या सोहळ्याचे विशेष आकर्षण आणि सन्मानाचा क्षण ठरली.
‘हा सोहळा परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा’
याप्रसंगी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “आपण आज केवळ इतिहास वाचत नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवत आहोत. ज्या पवित्र भूमीवर हा विवाह सोहळा पार पडला, त्या ठिकाणी उपस्थित राहणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सोहळा आपली परंपरा, संस्कृती आणि वैभवाचा जिवंत वारसा आहे.”
तसेच, पूर्वी छत्रपतींचा इतिहास झाकोळण्याचे प्रयत्न झाले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने तो व्यापक स्तरावर पुढे आणण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा वैभव प्राप्त करून देणार
“करवंड येथील पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरुज्जीवन करणे आणि येथे उभा असलेला ऐतिहासिक राजवाडा पुन्हा जनतेसमोर सजीव स्वरूपात उभा करणे हीच आपली संकल्पना आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मांडला असून, मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल. या ठिकाणाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा ठाम विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.

