
सातारा जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’अंतर्गत दोन आर्थिक वर्षांत ४ हजार ३३२ लाभार्थ्यांना ९७ लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात वितरित करण्यात आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’अंतर्गत सातारा जिल्ह्यातील हजारो गरजू बालकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत जिल्हा महिला व बाल विकास विभागाने मिळून एकूण ४ हजार ३३२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर तब्बल ९७ लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान थेट वर्ग केले आहे.
दोन वर्षांतील अनुदान वाटपाची आकडेवारी :
विभागाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील दोन वर्षांत अनुदानाचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
-
सन २०२४-२५ : २,८९१ लाभार्थ्यांना ६५ लाख ४ हजार ७५० रुपयांचे वाटप.
-
सन २०२५-२६ : १,४४१ लाभार्थ्यांना ३२ लाख ४२ हजार २५० रुपयांचे वाटप.
योजनेसाठी कोण पात्र आहेत? (लाभार्थी निकष)
या योजनेचा उद्देश निराधार आणि गरजू बालकांना संरक्षण देणे हा आहे. खालील प्रवर्गातील किंवा परिस्थितीतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो:
-
अनाथ बालके, ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व ज्यांना दत्तक देणे शक्य नाही.
-
एक पालक असलेली बालके : एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार किंवा पालक रुग्णालयात असल्यामुळे कुटुंब विघटित झालेली बालके.
-
कौटुंबिक संकटातील (Family Crisis) बालके : कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद किंवा न्यायालयीन वादात बाधित झालेली बालके.
-
पालकांची स्थिती : कुष्ठरुग्ण, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने बाधित, एच.आय.व्ही. (HIV) ग्रस्त, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले, तुरुंगात असलेले किंवा भिक्षेकरी गृहात दाखल असलेल्या पालकांची बालके. तसेच दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके.
-
बालकांची शारीरिक/मानसिक स्थिती : ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेली, अंध, दिव्यांग, तीव्र मतिमंद, एच.आय.व्ही. ग्रस्त, कॅन्सरग्रस्त, दुर्धर आजार असलेली, तीव्र कुपोषित (SAM) आणि व्यसनाधीन बालके.
-
आपत्तीग्रस्त बालके : कोविड (COVID-१९) सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके. तसेच विविध दंगलींनी प्रभावित झालेली बालके.
-
शोषित व वंचित बालके : भिक्षा मागणारी, रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार, ‘पोक्सो’ (POCSO) अधिनियमांतर्गत बळी पडलेली, बालविवाहाला बळी पडू शकणारी, विधी संघर्षग्रस्त आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पालकांची बालके.
प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील गरजू बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संगोपनासाठी हे अनुदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या पात्र प्रवर्गातील बालकांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

