दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्था ही विविध प्रयोग करणारी संस्था असून, त्याचा आदर्श महाराष्ट्रातील शिक्षण संस्था घेत आहेत. शासनाच्या पुढे एक पाऊल टाकून बहुजनांच्या लेकरांना आदर्श जीवन जगण्याचे बळ रयत शिक्षण संस्थेत दिले जाते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेली संस्था आत्ता बहरलेली आहे. अण्णांची निष्ठा त्यागावर होती त्यामुळे कर्मवीर आण्णा त्यागाचे प्रतीक आहेत असे विचार रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्राचार्य मधुकर कोथमिरे यांनी मांडले.यावेळी अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र रणवरे,पी.एन. रणवरे,एम. एन. रणवरे, मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे,सरपंच पल्लवी लोखंडे,उपसरपंच अमित रणवरे,जितोबा देवस्थानचे अध्यक्ष विनायकराव रणवरे, जगदेवराव रणवरे सतीशराव रणवरे,पांडुरंग लोखंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते .मधुकर कोथमिरे पुढे म्हणाले की शिक्षणावर माणसाचे स्थान ठरत नाही त्यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे. संघटन कौशल्य व स्वचिंतन यावर रयत उभी असून कर्मवीर अण्णांनी माणूस उभा केला व माणूसपण बहाल केले.याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून विविध उपक्रमांची माहिती दिली व रयतेचे जगातील वेगळेपण स्पष्ट केले तसेच भविष्यात शाळा नावलौकिकास कशी येईल त्यासाठी सामूहिक प्रयत्न कसे महत्त्वाचे हे सांगितले. यावेळी एम.एन.रणवरे,विनायकराव रणवरे,सतीशराव रणवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेले स्पर्धक व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुरुवातीला कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून स्वागतगीताने उत्साही वातावरणात कार्यक्रमास सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत रमेश बोबडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय माने प्रदीप यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी जगदाळे व सौ.जगताप पोर्णिमा यांनी केले तर अंकुश सोळंकी यांनी आभार मानले.
22 सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहाने गावातून काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी महिला व आबालवृद्ध यांनी प्रतिमेचे पूजन केले व दर्शन घेतले. झांज पथक व टिपरी नृत्य याने रंगत आणली. यावेळी माजी मुख्याध्यापक शिंदे सर, प्रल्हाद काकडे, अॅड भोसले, विश्वास आप्पा, सोनवलकर अर्चना, शितल बनकर, भोसले गुरुजी, गजानन धर्माधिकारी, घाडगे आण्णा, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.