प्रवचने – भगवंताला विसरणे ही आत्महत्याच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.

आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसर्‍यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात, म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.

रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो ‘हूं, हूं’ करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने ‘सीतेला कसे ओळखायचे’ म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, “तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज.” तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी ‘चिरंजीव’ असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही; म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.


Back to top button
Don`t copy text!