दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या जे.जे. रुग्णालयाच्या डॉ. कल्याण मुंडे यांचा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । मुंबई । दोन महिन्याच्या बाळाच्या  ह्रदयाला असलेल्या छिद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन या लहानग्याला जीवनदान देणाऱ्या जे. जे. रुग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंडे यांचा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रहिवासी आणि मुंबईत रोजगारासाठी आलेल्या राहुल राठोड यांच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी गुलबर्गा येथील रुग्णालयात या बाळाच्या चाचण्या केल्या त्यावेळी या बाळाच्या हृदयाला ६ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले. काही डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर राठोड यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन डॉ. मुंडे यांच्याशी संपर्क साधला. खुली शस्त्रक्रिया न करता त्यांनी ट्रान्सकॅथेटर प्रक्रियेद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. कल्याण मुंडे यांनी अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन बाळाला नवजीवन दिल्याबद्दल मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डॉ. मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे, पत्रकार अमेय तिरोडकर, मंगेश चिवटे, दीपक कैतके आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!