न्यायालयाची पायरी न चढता तलाठी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दिला न्याय


 

दोन्ही गावच्या हद्दीमध्ये  तलाठी  गणेश बोबडे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ करताना (छाया-निनाद न्यूज, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.२९: ग्रामीण भागामध्ये जमीन व वाटणीचा वाद तसेच इतर कारणांमुळे अनेकदा ग्रामस्थांना पोलीस ठाणे व दिवाणी न्यायालयाची पायरी चढावी लागते. याचा अनुभव अनेक पिढ्यानी घेतला आहे. पण खटाव तालुक्यातील विसापूर- रेवलकरवाडी हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने तलाठी गणेश बोबडे यशस्वी मध्यम मार्ग काढल्यामुळे ग्रामस्थांनी या हद्दीच्या रस्त्यावर कामकाज सुरू करताना श्री बोबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सत्कार करून पुढील कामांचा ‘श्री गणेशा ‘केला. 

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विसापूर व रेवलकरवाडी ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी सामंजस्याची भूमिका घेऊन बैलगाडी जाण्याइतकी दोन्ही हद्दीच्या मधून सर बांध वाट तयार केली होती.दोन्ही बाजूंनी पाच फूट अंतर ठेवले होते. त्यावेळी लोकसंख्या कमी असल्याने रस्त्याची अडचण भासत न्हवती. पण अलीकडच्या काळात वाढते अतिक्रमणे व वाहनांची संख्या वाढली तसेच यंत्र सामुग्री सुद्धा आली. अशावेळेला हद्दीचा प्रश्न अधिकच बिकट बनला. भविष्यात या दोन्ही गावचा वाद मिटावा यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी खटावचे तहसीलदार, मंडलधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तलाठी गणेश बोबडे यांनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या पाच ते सहा वेळा बैठका घेतल्या. प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. त्यामध्ये दोन्ही गावची युवा पिढी सकारात्मक असल्याचे पुढे आले. त्यामुळे श्री बोबडे यांनी सुद्धा महसुली कामाची जबाबदारी स्विकारत रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी पार पाडली. 

गावचे प्रतिष्ठित नागरिक पै.सागरभाऊ साळुंखे, सूर्यकांत शिंदे, रघुनाथ मोरे, विजय जाधव, रोहिदास बिटले, धनाजी जाधव, गणपत पवार, विजय बिटले यांनीही हा हद्दीचा व रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल संबंधित महसूल विभागाचे तत्कालीन खटाव तहसीलदार डॉ अर्चना पाटील व विद्यमान तहसीलदार किरण जमदाडे आणि महसूल विभागाचे आभार मानून प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामस्थ व महसूल तलाठी अमोल बोबडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये समज, गैरसमजीतून वाद होतात. त्यातून दोन्ही बाजूच्या रक्तातील नात्याच्या ग्रामस्थांना पोलीस ठाणे व न्यायालयात दाद मागण्याची वेळ येते. कायदेशीर कारवाई व तारीख पे तारीखने पैसे व वेळ वाया जातो. या सर्व बाबींना फाटा देऊन आता या वाचलेल्या खर्चातूनच दोन्ही गावच्या हद्दीत चांगला रस्ता तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागामध्ये तंटामुक्त अभियान, हागणदारी मुक्त, कुऱ्हाडबंदी, पाणंद रस्ते मोकळे करणे ही योजना यशस्वीपणे राबवली.त्यामुळे काही गावात रोगराई नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे.असे ग्रामस्थांनी यापूर्वीच नमूद केले आहे. विसापूर व रेवलकरवाडीच्या ग्रामस्थांनी सामंजस्यची भूमिका घेतल्याने संपूर्ण सातारा जिल्हयात दोन्ही ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. 

दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केल्यामुळे तसेच सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल विभागाला सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार किरण जमदाडे यांनी कौतुक करून त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!