दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटणचे सुपुत्र विशाल कुदळे यांना १९ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये “ज्युरी स्पेशल अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आलेले आहे. विशाल कुदळे यांनी दिग्दर्शित केलेल्या “टक – टक” या मराठी चित्रपटाचा या सोहळ्यात मराठी चित्रपट स्पर्धा विभागात सहभाग होता.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा जगातील एक महत्वपूर्ण चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. यावर्षीचा सोहळा पुणे येथे पार पडला. या पूर्वी “टक – टक” या सिनेमाला २५ हुन अधिक जागतीक व राष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन व पारितोषिके मिळाली आहेत. तसेच आशिया बूक ऑफ रेकॉर्डसने सुद्धा या चित्रपटाचा गौरव केला आहे. दुबई येथे सुद्धा एक्स्पो दुबई २०२० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे या चित्रपटाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण चित्रपटामध्ये केवळ एकच कलाकार आहे. फलटणच्याच अनिश गोसावी याने यात भूमिका साकारली आहे. तसेच संपूर्ण चित्रीकरण हे फलटण मध्येच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मेडीयम स्कूल येथे पार पडले आहे.