स्थैर्य, सातारा, दि.२: महाराष्ट्राबद्दल भाजपचे इतके प्रेम काही की त्यांनी येथील उद्योग धंदे, योजना, शासकीय कार्यालये गुजरातला घेऊन गेलेत. आता उत्तर प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र तोडायचा, मोडायचा आणि राग काढायचा हा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. दर वेळेला गळा काढणारे भाजपचे नेते याविषयावर का बोलत नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत आले आहेत. बॉलिवूड निर्मात्यांसोबत तसेच राज्यातील उद्योजकांसमवेत ते चर्चाही करणार आहेत. काही वेळापुर्वी योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. हा सर्व खटाटाेप उत्तर प्रदेशातील आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांचा सुरु असल्याची टीका हाेऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काॅंग्रेस तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी हा दाैरा म्हणजे इथलं आहे ते आपल्याकडे पळवापळवी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहेत.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्राबद्दल त्यांना प्रेम आहे का नाही. त्यांनी सगळ्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी येथे येऊन वातावरण निर्मिती करायची त्यानंतर वत्कृत्व करायचे आणि बैठका घेऊन एक प्रकारे अपमान असून हे आव्हानही आहे. ही परिस्थिती भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर वाढीला लागली आहे. पहिले असे कधीही होत नव्हते. आता कोणाचीही चौकशी असो, कोणाची माहिती घेताना महाराष्ट्र सरकारची परवानगीची भिती न बाळगता कार्यवाही केली जात आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला अशी सापत्न वागणूक देण्याचा प्रकार भाजपकडून होत असेल तर महाराष्ट्रातील जनतेने विचार करून याविरोधात उठाव करायला हवा. त्यांचे हे सर्व ठरवून चाललेले आहे. हे भाजपचे महाराष्ट्राविषयी प्रेम नसुन व्देष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.