‘ते’ स्वप्नीं दिसे…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‘आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय!’ आणि ‘सरकार तुम्ही केलंया मार्केट टाईट’ अशा दोन भिंती एकमेकांना क्रॉस होत पुढे जाण्यासाठी धडपडत होत्या. एकाच ठिकाणी पोचायला दोन विरुद्ध दिशेचे मार्ग पकडून भरलेल्या ट्रॉलीत, सर्वसमावेशक असा, जिवंत, द्विपद तारुण्याचा, झिंगाट उभा देखावा, एकमेकांकडे नेहमीच्या खाऊ का गिळू नजरेचे तुंबळ युद्ध करण्यात गुंतला होता. मूळच्याच अरुंद रस्त्यावर उभारलेला एक शामियाना ‘चांदी की डाल पर सोने का मोर’ नाचवत आणि ‘ताक झाक’ करत आपल्या हद्दीत, ‘वाढीव आवाजाचा डीजे’ किंवा ‘मार्केट टाईट’ करणारं सरकार, यातल्या कोणाचा तोल जात नाहीं ना, ह्यावर नजर ठेवून आपली ट्रॉली सजविण्यात गर्क होता. गनिमाची एखादी चुकून झालेली हालचाल आपल्यावर होणार्‍या वारांची तयारी असते, असे प्रशिक्षण मिळालेले आणि धुमश्चक्रीच्या तयारीत व्यस्त असलेले स्वयंघोषित रक्षकांचे जथ्थे, त्यातच कायदा-सुव्यवस्थेचा निळा रथ आणि लाठ्या-काठ्यांसहित खाकी, आपापल्या झेंड्यागेंड्यासह आब राखून वावरणारे खादीधारी, मागे-पुढे धडाडणार्‍या आवाजाच्या गगनचुंबी भिंती आणि यातूनच दोन-तीन-चार चाकांची सांध्यासापटीतील घुसाघुसी, या सगळ्यांचे मिश्रण होऊन भेगारहित प्लॅस्टर केलेले पक्के बांधकाम रस्त्यावर झाल्याचा भास होत होता.रस्त्यावरल्या दोन ट्रॉलींच्या बारक्याशा बिळात माझी दुचाकी अडकली आणि जगातल्या घोर पापातील एक माझ्याकडून घडले. ‘एवढी अक्कल नाही का’पासून सुरवात झाली आणि सर्व प्रकारच्या आरत्या करवून घेत पुढच्या गर्दीत जायला वाट मिळाली. ‘ऑल इज वेल’ म्हणून छातीवर हात आपटायची सोयच नव्हती. कारण धडाडणार्‍या भिंतीने छातीचा वेध कधीच घेतला होता. एकूण काय दुचाकीवर पायात ठेवलेल्या गणरायाला तू स्वतः घाबरू नकोस रे बाप्पा आणि ‘मलाही बळ दे’ ची आर्त हाक देत जीव एक्सीलेटरच्या मुठीत घेऊन मार्गक्रमण चालू ठेवले. कानावर घुसणारा गोंगाट शिव्या शापांपासून आपसूकच मुक्ती देत होता.

दीड दिवसांच्या बाप्पाला आणायला करावी लागणारी ही गाडीवरची कसरत करत करत कसा-बसा घरी पोचलो. फाटकापाशी पोचतच सामानाच्या दिलेल्या यादीतील मिसिंग घटकांची यादी आ वासून उभी होती. सग्यासोयर्‍यांना नमवून क्लांत झालेल्या, गलितगात्र अर्जुनास पुन्हा गांडिव हाती घ्यायची वेळ आली. घरी सूक्षम पोहोचलेल्या बाप्पास मखरात स्थानापन्न करून विसाव्याच्या एका चहाची वर्दी दिली आणि एकूणच आलेला बधीरपणा घालवण्यासाठी जरासा लवंडलो. चिरनिद्रेला लाजवील अशा झोपेच्या कधी आधीन गेलो कळलेच नाही. डोळ्यांपुढे ‘एक गाव एक गणपती’चा प्रस्ताव घेऊन शिवरायांकडे निघालेले ‘लोकमान्य’ दिसायला लागले. गणराया पुढ्यात बसून महाराज गणरायाचे गार्‍हाणे ऐकत होते. बहिर्जी आपल्या कानात घातलेल्या ‘साऊंडप्रूफ ईअर प्लग’ काढून बाप्पाचे होणारे हाल कथन करीपर्यंत लोकमान्य येऊन पोचले. गणाधिशा! आपल्याला होणार्‍या त्रासास मीच कारणीभूत आहे, मला माफ करा. ‘महाराज शांतता’ हा गणरायाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी त्याला मिळवून देणारच, असे म्हणून महाराजांपुढ्यात त्यांनी ‘एक गाव एक गणपती’ची योजना सांगण्यास सुरवात केली.

स्वप्नकाळात, अडकित्ता हाती घेत लोकमान्यांनी सुपारी बारीक कातरली. झुपकेदार मिशांच्या आडून त्यांनी ती तोंडात टाकली आणि ???? त्याचवेळी वर्तमानात, एक द???नं फटाका उडाला. ‘वाट तुझी बघतोय रिक्षावाला’ कानावर पडले. झोप चाळवली. व्यत्ययाची पाटी दिसली. मी एक भरभक्कम उशी कानावर दाबून कूस बदलली, व्यत्ययाची पाटीला बाजूस करून डोळ्यांपुढे बघतो तो एका प्रचंड मोठ्या वडाने गणरायाचे रूप घेतलेले दिसले. चौफेर, कदंब, करंज, शिसू यांच्यासोबत बेल-बकुळ-बहावा यांचा हिरवागार मांडव दिसत होता. गणेशरूपी वडाच्या मागील बाजूस लालचुटूक जास्वंद बहरला होता. हिरव्या पानांतून डोकावणारी जाईजुई, समोरील तळ्यात मोठाल्या पानातून झेपावणारी असंख्य कमळे आणि उन्हाळा नसूनही बहरलेला अमलताश या सगळ्यांमुळे रंगीतसंगीत झालेला मुझिक लाईट देखावा नयनरम्य वाटत होता. नैसर्गिक आभूषणे ल्यालेल्या सभागृही वसलेली सौंदर्यपूर्ण नैसर्गिक शांतता स्वप्नातसुध्दा मन मोहरवित होती. एकमेकांना आलिंगन देत आनंदाने एकत्र येणार्‍या समस्त गावकर्‍यांमुळे फुलून गेलेला आसमंत स्वर्गीय उत्साही वाटत होता. आपला गाव, आपला गणपती, आपला सण अशा आपलेपणात जो-तो ‘आपल्या घरचं कार्य’ या भावाने सहभागी झालेला असल्याने कुठल्याही दुजाभावाला इथे थारा दिसत नव्हता. सप्नातसुध्दा इतकी पवित्र शांतता सहन होईना.

‘च???हा! चहा होईपर्यंत घोरायलांसुध्दा लागलास’ या वाक्याने स्वप्नभंग झाला. मारून मुटकूनही स्वप्न काही ‘कंन्टीन्यू’ होईना. महाराजांचे म्हणणे ऐकायचा, गणरायाला आनंदात बघायचा, लोकमान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा स्वप्नातला हा प्रयत्न कानाशी वाजणार्‍या ‘डीजेवाले बाबू’ने उधळून लावला. ‘दूर कुठं तरी’ म्हणायची सोयंच नाही, अशा स्थितीत आसमंती कोकलून पप्पी मागणार्‍या ‘पप्पी दे पारू’ने भानावर आणले आणि उर्वरित सामान आणायला पिशवीरुपी गांडिव हाती घेतले. वाट पाहणारा हा सजना संकटी पावणार की येत्या संकष्टीला असा प्रश्न डोक्यात घेऊन दुचाकीच्या रिकिबित पाय घातला झालं.

– एम. बी.
९ सप्टेंबर २०२४


Back to top button
Don`t copy text!