फलटण: आयआरएस तुषार मोहिते यांचे कार्य – तरुणांसमोर नवा आदर्श

फलटणचे सुपुत्र व वरिष्ठ आयकर अधिकारी तुषार मोहिते यांनी प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य करत तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) आयकर विभागात कार्यरत असलेले फलटण तालुक्यातील सुरवडीचे सुपुत्र तुषार मोहिते यांनी प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांचे कार्य, वैचारिक अधिष्ठान आणि सामाजिक योगदान खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहे.

प्रशासकीय सेवेतील यशस्वी वाटचाल

तुषार मोहिते हे भारतीय महसूल सेवेच्या (IRS) २०११ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते मुंबई येथे अतिरिक्त आणि संयुक्त आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सार्वजनिक सेवेतील सुमारे १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, बी.एस्सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कठोर परिश्रम आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर त्यांनी हे मोठे यश संपादन केले आहे.

संविधानाचा जागर आणि सामाजिक कार्य

प्रशासकीय जबाबदारी पार पाडत असतानाच मोहिते यांनी समतावादी विचार आणि संविधानाचा जागर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप आणि जनजागृतीचे काम ते सातत्याने करतात. तसेच, अनेक बुद्धविहारांना मूर्तींचे दान आणि ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे त्यांनी मोठ्या प्रमाणावर वितरण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या उत्पन्नातील एक हिस्सा समाजासाठी खर्च करण्याच्या संदेशाचे ते प्रत्यक्ष आचरण करतात.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत

समाजातील शोषित आणि उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोहिते यांनी नेहमीच आर्थिक व नैतिक पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची संधी मिळावी, यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नि:स्वार्थ कार्याबद्दल आणि धम्मनिष्ठ जीवनशैलीबद्दल भारतीय बौद्ध महासभा परिवाराने त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!