आंतरराष्‍टीय ग्राहक हक्‍क दिन उत्‍साहात साजरा- ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण आवश्यक – मा. राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी


स्थैर्य, मुंबई, दि.१९: रोजी आतरराष्‍टीय ग्राहक दिवस महाराष्‍ट्र शासन आणि राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुबई यांचे संयुक्‍त विद्यमाने ऑनलाईन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमासाठी महामहीम राज्‍यपाल, मा. भगतसिंग कोश्‍यारी यांनी प्रमुख पाहुणे म्‍हणून कार्यक्रमाचे उदघाटन केले व मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी मा. खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांनी सन्‍माननीय अतिथी म्‍हणून ऑनलाईन शुभेच्‍छा दिल्‍या. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्‍ते म्‍हणून राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्‍यक्ष न्‍या. आर. सी. चव्‍हाण, न्‍या. ए. पी. भंगाळे, राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्‍या माजी सदस्‍या मा. राजलक्ष्‍मी राव, राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्‍यक्ष मा. श्री. दिलीप शिरासाव, ग्राहक न्‍यायालयाच्‍या वकील संघटनेचे अध्‍यक्ष मा. ऍड. उदय वारुंजीकर, तसेच मुंबई ग्राहकपंचायतचे अध्‍यक्ष ऍड. शिरीष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्‍य डॉ.कंटीकर हे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्‍य डॉ. संतोष काकडे यांनी केले.

आर्थिक उलाढालीमध्‍ये प्रत्‍येक मनुष्याची ग्राहक म्‍हणून भूमिका नाकारता येत नाही. तसेच, झालेल्‍या आर्थिक व्‍यवहारामध्‍ये ग्राहकाची फसवणूक होणारच नाही अशी स्थिती नसते. त्‍यामुळे जगभरात व भारतात देखिल ग्राहक चळवळीचे कार्य आहे. ग्राहक चळवळीचे गांभिर्य व मागण्‍या ओळखून अमेरिकेचे तत्‍कालिन अध्‍यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी 15 मार्च, 1962 रोजी ग्राहकांच्‍या चार अधिकारांना अमेरिकन कॉंग्रेसमध्‍ये मान्‍यता दिली. यामध्‍ये ग्राहकाच्‍या सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळवण्‍याचा अधिकार, वस्‍तु किंवा सेवा निवडीचा अधिकार व ऐकून घेण्‍याचा अधिकार यांचा समावेश आहे. पुढे 1985 साली संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शन अशी नियमावली प्रश्रुत करुन ग्राहकाच्‍या मुलभूत गरजांच्‍या समाधानाचा अधिकार, वाद निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, हे अधिकार देखिल मान्‍य केले. संयुक्‍त राष्‍ट्र्रसंघाची नियमावली व ग्राहक चळवळीची मागणी विशेषतः आदरणीय ग्राहक तीर्थ मा. बिंदुमाधव जोशी यांच्‍या ग्राहक पंचायती तर्फे होत असलेली प्रभावी ग्राहक संरक्षणाची मागणी लक्षात घेऊन भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा,1986 अंमलात आणला. या कायदयामुळे ग्राहकाचे वस्‍तु निवडीचा अधिकार, ऐकून घेण्‍याचा अधिकार, वादनिवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार मान्‍य करण्‍यात आला व ग्राहक संरक्षणासाठी जिल्‍हा स्‍तरावर जिल्‍हा ग्राहक मंच, राज्‍य स्‍तरावर राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, व राष्‍ट्रीय स्‍तरावर राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली. तसेच बाजाराची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सन 2019 मध्‍ये नवीन ग्राहक संरक्षण कायदा भारतीय संसदेने पारित करुन, ग्राहकांना सुलक्ष पध्‍दतीने न्‍याय मिळेल याची व्‍यवस्‍था केली आहे. या सर्व बाबींचे ज्ञान सामान्‍य ग्राहकाला होणे आवश्‍यक असल्‍याने या दिवसाचे विशेष औचित्‍य आहे.

हया प्रसंगी बोलताना मा. राज्‍यपाल हयांनी मा. बिंदुमाधव जोशी हयांनी ग्राहक संरक्षणासाठी दिलेल्‍या योगदानाची आठवण करुन दिली. व्‍यवहारामध्‍ये नैतिकतेचे महत्‍व फार मोठे आहे. तसेच छोटया रकमेच्‍या तक्रारी जरी असल्‍या तरी सामान्‍य ग्राहकांना त्‍यांचे विवादासाठी ग्राहक आयोगाचे प्रभावी व्‍यासपीठ उपलब्‍ध असलेचे सांगितले. नेहमीच्‍या बाजारपेठेची जागा आता ऑनलाईन बाजाराने घेत असल्‍याचे त्‍यांनी अधोरेखित केले. त्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांचे अधिकाराबाबत अधिक सजग करण्‍याची करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे सांगितले. हयासाठी वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते, न्‍यायालयीन अधिकारी हयांनी अधिक योगदान देण्‍याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, राज्‍य ग्राहक आयोगाने त्‍यांचे पुढीलअडचणी सोडवणे कामी स्‍वतंत्र आराखडा बनवावा व राज्‍य शासनाकडे पाठविण्‍याची सूचना त्‍यांनी केली आहे व राज्‍य शासन त्‍याची दखल घेईल हे त्‍यांनी सूचित केले.
मा. शरदचंद्र पवार साहेब हयांचा ऑनलाईन शुभेच्‍छा संदेश प्राप्‍त झाला. ग्राहकांना अधिकाराची जाणीव करुन देणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मा. न्‍यायमूर्ती श्री. चव्‍हाण साहेब हयांनी सुरुवातीस ग्राहक हक्‍क दिनाचे महत्‍व सांगितले. तसेच यापुढील काळात भारतीय बनावटीचे उत्‍पादने वाढायला हवी व त्‍यांची कार्यक्षमता व विश्‍वासार्हता याबाबत जगभर संदेश जायला हवा अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. भारत हा देश वैद्यकिय क्षेत्रात उपचारासाठी मेडिकल हब म्‍हणून पुढे येवू शकतो हे त्‍यांनी आग्रहाने नमूद केले व ग्राहक न्‍यायालयाने परिस्थितीजन्‍य पुरावा तपासून अधिक कार्यक्षमतेने न्‍यायदानाचे काम करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन केले.
मा. भंगाळे साहेब हयांनी शेतक-यांचे ग्राहक म्‍हणून असलेल्‍या हक्‍क विशद केले. ग्राहक संरक्षण कायदयान्‍वये वस्‍तु किंवा सेवेच्‍या माहितीचा अधिकार, वस्‍तू निवडण्‍याचा अधिकार, दाद मागण्‍याचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, प्रबोधनाचा अधिकार हे प्रमुख अधिकार असल्‍याचे सांगितले व शेतक-यांनी याबाबत जागत राहून व्‍यवहार करण्‍याची आवश्‍यकता प्रतिपादन केली. तसेच जमिनीचे माती पर्रिक्षण करुन घेवून शक्‍यतोवर तज्ञांच्‍या सल्ल्याने, आवश्‍यकते नुसार बियाणे, खते, औषधे, साधने विकत घ्‍यावीत असे त्‍यांनी सुचविले.
राष्‍टीय आयोगाच्‍या माजी सदस्‍या मा. राजलक्ष्‍मी राव हयांनी 2019 चा कायदा हा ग्राहकांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी सुलभ असल्‍याचे सांगितले. तसेच मा. सर्वोच्‍च्‍य न्‍यायालयाने देखिल ग्राहकाचे बाजूने अनेक निवाडे दिल्‍याचे सांगितले. तसेच पर्यावरणाचा जो धोका निर्माण झाला आहे त्‍याचे गांभिर्य ओळखून प्रदुषणापासून मुक्‍ती हा चालु वर्षीच्‍या जागतिक ग्राहक अधिकार दिवसाची भूमिका असल्‍याचे सांगितले. मा. पंतप्रधानांच्‍या स्वच्‍छ भारत मिशन उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन प्‍लास्‍टीकच्‍या अनिर्बंध वापरास नाकार देण्‍याची आवश्‍यकता प्रतिपादन केले. प्‍लास्‍टीकमुळे आज सागरी जीवनास प्रचंड धोका निर्माण झाल्‍याचे देखिल त्‍यांनी नमूद केले.

राज्‍य ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्‍यक्ष श्री.शिरासाव साहेब यांनी 2019 च्‍या ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या विशेष तरतूदी बाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांनी कुठेही जरी माल खरेदी केला असला तरी त्‍याचे राहते ठिकाणी ग्राहकांना दावा दाखल करता येईल. एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे जिल्‍हा आयोगापुढे दाखल करता येतील. ग्राहक न्‍यायालयांना मदतीसाठी मध्‍यस्‍थांचे पॅनल असेल, भ्रामक जाहिरातींदवारे ग्राहकांची फसवणूक टाळण्‍यासाठी केंद्रीय स्‍तरावर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची निर्मिती व त्‍यांना तपासाचे विशेष अधिकार असणे, सदोष वस्‍तुच्‍या निर्मितीसाठी निर्माता व इतर यांची जबाबदारी या विषयीच्‍या तरतूदींबाबत माहिती दिली.

ऍड. वारुंजीकर यांनी ग्राहक संरक्षणा साठी वकीलांनी आजपर्यंत दिलेल्‍या योगदानाबददल्‍ अवगत केले. तसेच मध्‍यस्‍थाचे पॅनलवर काम करणेसाठी अनेक वकील प्रशिक्षित झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्‍यक्ष अॅड. शिरिष देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या अंमलबजावणीने ग्राहकांना कितपत फायदाझाला याबाबत मत मांडताना आजपर्यत जरी या क्षेत्रामध्‍ये वाखाणण्‍याजोगेकाम झाले असलेतरी यापुढील काळात खूप काही करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे नमूद केले. बदलत्‍या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्‍हाने पेलण्‍यासाठी नवीन कायदा सक्षम असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच ग्राहक न्‍यायालयाने कायदयाने दिलेल्‍या मुदतीत संक्षेपात व सुटसुटीत पध्‍दतीने न्‍यायनिर्णय पारित करण्‍याची आवश्‍यकता प्रतिपादित केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्‍य ग्राहक आयोगाचे सदस्‍य श्री. किसनराव लवांडे यांनी केले. मुख्‍य अतिथी व प्रमुख वक्‍ते तसेच राज्‍य ग्राहक आयोगाचे इतर सदस्‍य, जिल्‍हा आयोगाचे अध्‍यक्ष व सदस्‍य, वकील संघटनेचे व ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी, ग्राहक या सर्वांचे आभार मानून ग्राहकाने स्‍वतः राजा आहे हे समजून घ्‍यावे लागेल व स्‍वतःच्‍या हक्‍कासंबंधी जाग़त राहून अन्‍याय होत असेल तर न्‍यायालयीन प्रक्रियेचा आधार घेणे आवश्‍यक राहील असे प्रतिपादन केले. आभार प्रदर्शनामध्‍ये त्‍यांनी पुढे नमूद केले की, महाराष्‍ट्रातील संतांनी समाजाचे प्रबोधन नेहमीच केले आहे. परमार्थ साधतांना योग्‍य रीतीने संसार करण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत संतांनी मार्गदर्शन केले आहे. संतांच्‍या शिकवणीतून सामान्‍य माणसाकडून दैनंदिन व्‍यवहार पार पाडत असताना सामान्‍य जनांसाठी एक ग्राहक म्‍हणून देखील संतांनी प्रबोधन केल्‍याचे सांगितले. समाजामध्‍ये आर्थिक व्‍यवहार हे नैतिक व शुध्‍दतेच्‍या पायावर असावेत तसेच आपल्‍या जवळील संपत्‍तीचा चैन, चंगळ,अनावश्‍यकता किंचा पर्यावरणाला धोका इ. गोष्‍टी टाळून खर्च करावा याबाबत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा प्रसिद्ध अभंग त्‍यांनी मांडला–

“ जोडोनिया धन उत्‍तम व्‍यवहारे, उदास विचारे वेच करी |
उत्‍तमची गती तो एक पावेल उत्‍तम भोगिल जीवखाणी || “

या अभंगादवारे वस्‍तुचा निर्माता, वितरक किंवा सेवा पुरवठादार यांनी नैतिकता व शुध्‍दतेच्‍या पायावर धन मिळवावे व ग्राहकाने विचारपूर्वक, संयमाने धनाचा उपभोग घ्‍यावा व दोघांनीही उत्‍तम गती मिळवावी ही शिकवण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. व हा अभंग ग्राहक संरक्षणाचा आत्‍मा असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाची सांगता डॉ. संतोष काकडे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!