वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचना


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । सोलापूर । दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविणे शक्य नसले तरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला नवीन ब्रीज कम बंधारा बांधून पाणी साठवण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे वडापूर, वडकबाळ बंधाऱ्याबाबतच्या आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता एन.व्ही. जोशी, रमेश वाडकर, उजनी-डाव्या कालव्याचे रमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी सांगितले की, वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे. मात्र भूसंपादन, कृष्णा पाणी तंटा लवाद, अतिक्रमण यामुळे उंची वाढविणे शक्य नाही. उंची वाढविण्याऐवजी नवीन छोटा बंधारा बांधून पूराचे पाणी साठवता येईल. जिल्ह्यातील सीना-भोगावती या जोडकालव्याबाबत सर्वेक्षण करा.

वडापूर बंधाऱ्याबाबत निधीची कमतरता नाही. मध्यवर्ती चित्र संघटना नाशिक यांच्याकडून त्वरित डिझाईन मिळवून बंधाऱ्याचे काम चालू करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी केल्या. मानेगाव-खैराव बंधाऱ्यावर उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार असून याचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या. अधीक्षक अभियंता श्री. शिंदे यांनी वडकबाळ बंधारा, वडापूर बंधारा याबाबतची स्थिती मांडली.


Back to top button
Don`t copy text!