आषाढी वारीतील सेवा-सुविधांची ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । पंढरपूर । वारकरी भाविकांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज पंढरपुरातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनास आवश्यक सूचना केल्या.

यावर्षीची आषाढी वारी स्वच्छ, सुंदर, “निर्मल वारी” व्हावी याकरिता ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी आषाढी पालखी सोहळ्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी तात्पुरती शौचालये, पिण्याकरता स्वच्छ पाणी, निवारा यांची सोय करण्यात आली होती. तसेच वारकऱ्यांसाठी पंढरपुरमध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी  आल्यानंतर  ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते वारकऱ्यांना विनाशुल्क  पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

ग्राम विकास मंत्री श्री महाजन यांनी आज महाद्वार, चंद्रभागा वळवंट, गोपाळपूर, चौफाळा व मंदिर परिसरास भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी  प्रशासन तत्पर आहे असे महाजन यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी मंदिर परिसर, नदीकाठी आणि सभा मंडपात भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची त्यांनी पाहणी केली व अधिकाऱ्यांना वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही उणीव राहू नये याबाबत सूचना दिल्या.

वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला शासनाने प्राधान्य दिले असून यासाठी फिरता दवाखाना बाईक ॲम्बुलन्स यास आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्यसेवा पुरवताना प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी आरोग्य विभागास दिल्या.


Back to top button
Don`t copy text!