लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 


स्थैर्य, सातारा, दि.१: लिंब (ता. सातारा) येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर त्याच गावातील गाव गुंडांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समता माजी सैनिक संघटना पुढे सरसावली आहे. दरम्यान, या बेदम मारहाणीत माजी सैनिक प्रकाश भोसले यांच्या सुनेचा गर्भपात झाला असून, या प्रश्‍नी संशयितांवर ठोस कारवाई होण्यासाठी उपोषण, आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, लिंब येथील माजी सैनिक प्रकाश भोसले यांच्यावर दि. 19 डिसेंबर रोजी किरकोळ कारणावरून घरालगतच्या राजन संजय भोसले व अन्य चौघांनी बेदम मारहाण केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, आपल्या सासर्‍यांना होणारी मारहाण पाहून भोसले यांची सून प्रतीक्षा केवल भोसले यांनी ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित सर्व आरोपी त्यांच्या अंगावरही धावून गेले. राजन भोसले याने प्रतीक्षा यांच्या पोटावर लाथा-बुक्क्या मारल्या. तसेच सर्व मंगल संजय भोसले यांनी प्रतीक्षा यांचे केस ओढून त्यांना जमिनीवर पालथे पाडले. याचा प्रतीक्षा यांच्यावर मानसिक व शारीरिक दुष्परिणाम झाला असून, त्यांच्या दीड महिन्याच्या अर्भकाचा पोटातच मृत्यू झाला आहे. या भ्रृणहत्येस राजन भोसले व त्यांचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप भोसले कुटुंबीयांनी या पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, लिंब प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संबंधित डिस्चार्ज रिपोर्ट व औषधोपचाराची कागदपत्रे घेऊन प्रतीक्षा भोसले व त्यांचे कुटुंबीय तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेले असता तेथील पोलीस कर्मचार्‍यांनी आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही. आमचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर सायंकाळी या. तेव्हाच तुमची तक्रार नोंद घेऊ, अशी अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी फक्त प्रकाश भोसले यांना झालेल्या मारहाणीची तक्रार तालुका पोलिसांनी नोंद घेतली आहे. त्यामुळे आपल्या माजी सैनिक बांधवावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील विविध माजी सैनिक तसेच समता माजी सैनिक संघटना पुढे सरसावल्या असून, त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी न्याय न मिळाल्यास 12 जानेवारी रोजी जिजामाता जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोसले कुटुंबीयांसह जिल्ह्यातील माजी सैनिक बेमुदत उपोषण करणार आहेत, तसेच आत्मदहन आंदोलनही करणार आहेत.
 या निवेदनाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवरांना देण्यात आल्या आहेत.
या पत्रकार परिषदेस भोसले कुटुंबीयांसह सुभेदार मेजर अशोक कांबळे, सुभेदार वसंत वाघमारे, गोरखनाथ भोसले, हवालदार मधुकर मोरे, प्रकाश भोसले, नायक साहेबराव माने, हनुमंत माने, सुभेदार मोहन यादव, सुभेदार कॅप्टन दयानंद शिरसाट आदी माजी सैनिक  उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक निष्क्रिय : सोरटे
सातार्‍याचे जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांचा पोलीस यंत्रणेवर तसेच जिल्ह्यातील सुव्यवस्था राखण्यावर वचक नसल्याचा आरोपही सुभेदार मेजर कॅप्टन जयसिंग सोरटे, विश्‍वनाथ गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेत केला.

Back to top button
Don`t copy text!