इंदापूरात करोनाच्या सहाव्या रुग्णाचा शिरकाव


स्थैर्य, पुणे, दि. 06 : गेल्या तीन महिन्यांपासून इंदापूर शहर करोनामुक्‍त ठेवण्यास प्रशासन यशस्वी झाले होते. मात्र, शहरातील 78 वर्षीय व्यक्‍तीस करोनाची लागण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या व्यक्‍तीस पुण्यात उपचारासाठी गेल्यावर करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात तिच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

इंदापूर शहरातील ही व्यक्‍ती गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ सोलापूर येथे आपल्या मुलीकडे रहावयास होती. त्यांना त्रास जाणवू लागल्याने दि. 31 मे रोजी इंदापूर शहरात आले होते. त्यानंतर सोमवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे रुग्णवाहिकेने नेण्यात आले. त्यावेळी पहिली करोना चाचणी निगेटिव्ह आली तर गुरुवारी दुसरी चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल आज  पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इंदापूर प्रशासनाकडून दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक, टेंभुर्णी नाका असा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी आज सकाळी त्या भागात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या बाधिताच्या संपर्कात आलेल्या घरातील तिघे, रुग्णवाहिका चालक व रुग्णाचा पुतण्या, रुग्णाला रिक्षाने सोडणाऱ्या रिक्षा चालकासह संपर्कात आलेल्या एकूण 19 व्यक्‍तींना विलगीकरण करण्यात आले असून त्यांची स्वॅब घेण्यात येत आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

इंदापूर शहरात कोविड 19 टीम व प्रशासनाने भेट देऊन शनिवारी सकाळी परिसराची पाहणी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी. नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री.

इंदापूर तालुक्‍यात करोनाचे पाच रुग्ण होते. त्यापैकी भिगवण येथील महिलेचा मृत्यू झाला. तर चार रुग्णांवर इंदापूरच्या आरोग्य विभागाच्या टीमने यशस्वी उपचार करून दि.29 मे व 1 जून रोजी करोनामुक्‍त घोषीत करत त्यांना घरी सोडले. मात्र शनिवारी इंदापूर शहरात सहावा रुग्ण सापडल्याची बाब समोर आल्यानंतर नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभाग क्रमांक चार संपूर्ण सील करून, संपूर्ण शहरात पुन्हा जनजागृती जोमात सुरू केली आहे.
– डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!