भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीत मोठा बदल; ‘आरएसी’ पद्धत बंद होण्याची शक्यता, लोकलेखा समितीच्या आक्षेपानंतर नव्या पर्यायांवर विचार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसूल करूनही सामायिक बर्थवर प्रवास करावा लागत असल्याच्या मुद्यावर संसदेच्या लोकलेखा समितीने (PAC) तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या ‘आरएसी’ (RAC) व्यवस्थेचा फेरविचार सुरू असून, भविष्यात प्रवाशांचे तिकीट एकतर थेट कन्फर्म होईल किंवा रद्द होईल, अशा स्वरूपाच्या नव्या व्यवस्थेवर विचारविनिमय सुरू आहे.

स्थैर्य, सातारा , दि. १६ नोव्हेंबर : रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा तिकीट वेटिंग लिस्टवर किंवा आरएसीमध्ये जाते. आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशाला गाडीत बसण्याची मुभा मिळते, परंतु एकाच बर्थवर दोन प्रवाशांना सामायिकपणे प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे, यासाठी प्रवाशांकडून पूर्ण तिकिटाचे भाडे आकारले जाते. ही बाब अनुचित असल्याचे सांगत संसदेच्या लोकलेखा समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूर्ण भाडे घेतल्यानंतर प्रवाशाला स्वतंत्र बर्थ मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.

संसदीय शिफारसी आणि रेल्वे प्रशासनाची भूमिका

लोकलेखा समितीने आरएसी पासधारकांना पूर्ण बर्थ उपलब्ध करून द्यावा अथवा भरलेल्या भाड्यात अंशतः परतावा (Refund) देण्याची व्यवस्था करावी, अशी शिफारस रेल्वे मंत्रालयाला केली आहे. या महत्त्वपूर्ण शिफारसीनंतर रेल्वे प्रशासनाकडून सध्याच्या आरक्षण नियमांचा सखोल अभ्यास केला जात आहे. अद्याप कोणताही अंतिम नियम अधिकृतपणे लागू झालेला नाही, परंतु आगामी काळात आरएसी प्रणाली बंद करून केवळ ‘कन्फर्म किंवा रद्द’ असा स्पष्ट पर्याय प्रवाशांसमोर ठेवला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!