मुंबईतील सातारकरांसाठी ‘शिवशाही’ची संख्या वाढविली : रेश्‍मा गाडेकर


 

स्थैर्य, सातारा, दि.२०: कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली एसटी वाहतूक तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. मात्र, सातारा आगारातून प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बसच्या फेऱ्या कमी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सद्यःस्थितीत प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने सातारा आगारातून पूर्ण क्षमतेने शिवशाही बस सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने मार्च महिन्यापासून लॉकडाउन केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कोरोना काही प्रमाणात नियंत्रित आल्यानंतर तीन महिन्यांपासून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे एसटी प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती; परंतु दिवाळीनंतर आगारात प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटी फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, तसेच लांब पल्याच्या शिवशाही बसही सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

सातारा विभागातून राज्यभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. मात्र, लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. मुंबई, बोरिवली, विनावाहक सातारा- स्वारगेट या मार्गावरील बसला प्रवाशांचा काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने केवळ त्याच मार्गावर आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी एसटी विभागाची मदार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी संख्या वाढल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांमधून एसटी फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहेत.

सातारा आगारातून 20 शिवशाही 

सातारा आगारात महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या 15 शिवशाही आहेत. यातील मुंबईसाठी आठ, तर बोरिवलीसाठी सात शिवशाही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत, तसेच भाडेतत्त्वावरील पाच शिवशाही सुरू होणार असल्याचे सातारा आगारप्रमुख (कनिष्ठ) रेश्‍मा गाडेकर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!