दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । सातारा । न्याय आपले दारी या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल लोक अदालतीच्या वाहन दौऱ्याचे प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी अध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस.एस.अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव ॲड. तृप्ती जाधव, जिल्हा सरकारी वकील ॲड. महेश कुळकर्णी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजयराव देशमुख, यांच्यासह मुख्यालयातील सर्व जिल्हा न्यायाधिश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, सर्व न्यायीक अधिकारी, वकील व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
संपूर्ण जिल्हयामध्ये दि. 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2023 अखेर मोबाईल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख बी.डी. खटावकर, निवृत्त न्यायाधीश हे पाहणार आहेत. दि. 3 व 4 ऑगस्ट मेढा, दि. 5 व 7 ऑगस्ट महाबळेश्वर, दि. 8 व 9 ऑगस्ट वाई, दि. 10 व 11 ऑगस्ट खंडाळा, दि. 14 व 16 ऑगस्ट फलटण, दि. 17 व 18 ऑगस्ट दहिवडी, दि. 19 व 21 ऑगस्ट म्हसवड, दि. 22 व 23 ऑगस्ट वडुज, दि. 24 व 25 ऑगस्ट कोरेगांव, 29 ऑगस्ट पाटण, दि. 30 व 31 ऑगस्ट कराड, असे फिरते लोक न्यायालय वाहन जाणार आहे.
तरी जिल्ह्यातील पक्षकारांनी या मोबाईल लोक अदालतीचा घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती जाधव यांनी केले आहे.