दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण या प्रशालेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी दिंडी सोहळ्याच्या (आषाढी वारी) फलटणमधील आगमनाच्या पार्श्वभूमीवर पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन अतिशय भक्तीमय व चैतन्यपूर्ण वातावरणात ८ जुलै रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर विद्येची देवता सरस्वती श्री विठ्ठल – रखुमाई, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे व पालखीचे पूजन तसेच दीपप्रज्ज्वलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी रविंद्र येवले सर व अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने रोपे देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजात संत तुकाराम व संत बहिणाबाई यांच्या अभंगांसह भजनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. इ. ४ थी व इ. ६ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनयासह प्रबोधनपर भारूडे सादर करून तापमानवाढ कमी करून पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन व प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संदेश दिला.
यानंतर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘माऊली… माऊली..’ या गीतावर उत्कृष्ट नृत्य केले आणि विद्यार्थ्यांनी चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाच सुंदर प्रात्यक्षिक सादर करून दाखवले. यावेळी प्रोग्रेसिव्हचे प्रांगण टाळ – मृदंगाच्या आवाजात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामासह ‘विठ्ठल नामा’च्या जयघोषात दुमदुमून गेले. या सोहळ्यामध्ये विद्यार्थी विठ्ठल – रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मीराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत एकनाथ महाराज अशा अनेक संतांसह, वासुदेव आणि वारकर्यांच्या पारंपरिक वेशभूषेत भगव्या पताका हाती घेऊन सहभागी झाले होते. त्यानंतर प्रोग्रेसिव्हच्या प्रांगणात हरिनामाच्या जयघोषात पालखीची प्रदक्षिणा संपन्न झाली. यावेळी बालवारकर्यांसह शिक्षक व पालकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
प्रमुख पाहुणे प्राचार्य रविंद्र येवले सर यांनी आपल्या मनोगतामध्ये या बालवारकर्यांच्या पालखी सोहळ्याचे विशेष कौतुक करून साक्षात संतांच्या मांदियाळीसह अवघी पंढरी या प्रांगणात अवतरल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच उपस्थितांना आषाढी वारीचे महत्त्व व महात्म्य सांगितले.
यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकारअरविंदभाई मेहता, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, कोळकीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रेश्मा देशमुख, लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या अध्यक्षा सौ. स्वाती चोरमले, सौ. निलम देशमुख, सौ. उज्ज्वला निंबाळकर, सौ. सुनिता कदम या सर्व पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ. सुजाता गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये पालकांनीही उस्फूर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समीक्षा सोनवलकर व कु. प्रगती ननावरे या विद्यार्थिनींनी केले तसेच आभार सौ. जयश्री घाडगे यांनी मानले. यावेळी प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.