दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
दि हॉकी सातारा संघटनेच्या खेळाडू कु. शिफा मुलाणी, कु. श्रेया चव्हाण व कु. निकिता वेताळ यांनी पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक पटकाविले असल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव महेश खुटाळे यांनी दिली आहे.
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दि हॉकी सातारा संघटना व मुधोजी हायस्कूलच्या तीन खेळाडू शिफा मुलांणी, श्रेया चव्हाण व निकिता वेताळ यांची छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली होती. त्यांनी छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. सातारा जिल्ह्याच्या शिफा मुलाणी, श्रेया चव्हाण व निकिता वेताळ अशा पहिल्यांदाच तीन हॉकी खेळाडूंना महाराष्ट्रात हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे सोने करत त्यांनी उत्कृष्ट खेळ करत पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक प्राप्त केले. त्यांच्या यशाने सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांनी दिली.
या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर व हॉकी प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री. बीबी खुरंगे सर, कु. धनश्री शिरसागर मॅडम सहाय्य करत आहेत.
सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगावणे सर व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री. सचिन लाळगे, खजिनदार श्री. पंकज पवार, सदस्य श्री. प्रवीण गाडे, श्री. महेंद्र जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.