दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
कु. वैष्णवी फाळके या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूने भारतीय संघासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी निश्चित अभिनंदनीय आहे. तिने फलटणचे नाव देशपातळीवर पोहचविले असल्याचे गौरवोद्गार काढत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कु. वैष्णवी फाळके या गुणी खेळाडूला भविष्यातील खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गोविंद फौंडेशन, फलटणच्यावतीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. वैष्णवी फाळके हिला तिच्या खेळासाठी प्रोत्साहन म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कु. वैष्णवीचे वडील विठ्ठलराव फाळके यांच्याकडे आपल्या ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस येथे सुपूर्द केला.
आपल्या गावातून, तालुक्यातून अथवा जिल्हयातून देशासाठी खेळू शकतो, हा विश्वास कोणीतरी निर्माण करून देण्याची आवश्यकता असते, तो विश्वास आसू, ता. फलटण येथील सुवर्णकन्या कु. वैष्णवी फाळके या हॉकी खेळाडूने निर्माण केल्याचे सांगत महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कु. वैष्णवीचे कौतुक केले.
कु. वैष्णवीच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्र व भारतीय संघाला विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयश्री आणि सुवर्ण, रौप्य, ब्रांझ पदक मिळवून देत आसू या छोट्या गावासह फलटण तालुका, सातारा जिल्हा पर्यायाने महाराष्ट्राला गौरवास्पद कामगिरीचा क्रीडा क्षेत्रातील वारसा वृध्दींगत केला आहे. कु. वैष्णवीची ही परंपरा सर्वांनी पुढे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. यापुढे कु. वैष्णवी ऑलंम्पिक, कॉमनवेल्थ स्पर्धेबरोबरच जागतिक हॉकी करंडक स्पर्धेतील भारतीय संघात तिचा सहभाग असेल, त्यावेळी ती देशाचे प्रतिनिधीत्व करेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी आपण सर्वजण तिला शुभेच्छा देऊया, अशी भावना महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
एशियन हॉकी स्पर्धेत देशाला कास्यपदक मिळवून देण्यात चमकदार कामगिरी करणारी आसू येथील सुवर्ण कन्या कु. वैष्णवी फाळके आणि कु. शिवानी बोडरे हिची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल आसू, ता. फलटण ग्रामस्थांच्यावतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कु. वैष्णवी फाळकेचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दिपक चव्हाण होते. यावेळी श्रीमंत सौ. दिव्यांजलीराजे खर्डेकर, श्रीमंत सौ. डॉ. निकिताराजे खर्डेकर, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वासराव उर्फ नानजी देवकाते, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामी साबळे व महादेव माने, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रमोद झांबरे, सरपंच महादेव सकुंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजीराव माने, नितीन गोडसे, भुजबळ गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर आणि आसू व पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यातील विविध खेळातील गुणवंत खेळाडू नेहमीच आपल्या खेळाच्या माध्यमातून फलटणचे नाव देशपातळीवर नेत आहेत. हॉकी खेळात मिडफिल्डर म्हणून कु. वैष्णवी फाळके हिनेही आपल्या खेळाचा दर्जा उंचावत संघासाठी केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी वअभिमानास्पद असल्याचे नमूद करीत आ. दिपक चव्हाण यांनी कौतुक केले.
बालेवाडीत गेलेली वैष्णवी असेल, तिरंदाजीतील प्रवीण जाधव असेल किंवा फलटण व साखरवाडीतील खो-खो खेळाडू मुले-मुली नेहमीच यशस्वी झाली, त्यामुळे बालेवाडीत जास्तीत जास्त मुले कशी जातील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी सांगितले.
प्रारंभी भारतीय हॉकीपटू कु. वैष्णवी फाळके आणि मुंबई पोलिस दलात निवड झालेली कु. शिवानी बोडरे या दोघींची जीपमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. उपस्थितांचे स्वागत उद्धव फाळके व विठ्ठलराव फाळके यांनी केले केले.
या सत्कारप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैष्णवीच्या पुढील कारकिर्दीसाठी १ लाख रुपये प्रोत्साहन पर मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नुकताच गोविंद फौंडेशनच्यावतीने विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते १ लाख रुपयांचा धनादेश तिचे पालक विठ्ठलराव फाळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.