मौजमजेसाठी घरातील दागिन्यांवर डल्ला; फलटण पोलिसांच्या कारवाईत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मौजमजेसाठी स्वतःच्याच घरातील सोन्याचे दागिने चोरून त्याची विक्री करणाऱ्या संशयितांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून महागडी दुचाकी, आयफोन आणि रोख रकमेसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी स्वतःच्याच घरातील सोन्याचे दागिने चोरून ते विकणाऱ्या चार संशयितांसह सोने खरेदी करणाऱ्या सोनाराला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत संशयितांकडून महागडी दुचाकी, मोबाईल आणि सोन्यासह तब्बल ९ लाख १३ हजार ४०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दागिने विकून दुचाकीची खरेदी

मंगळवार पेठ येथील एका महिलेने घरातील ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घरातील एका अल्पवयीन मुलीच्या मित्रांनी संगनमत करून हे सोने चोरले आणि बारामती येथील एका मित्राच्या मध्यस्थीने तेथील एका सोनाराला विकले. या चोरीतून मिळालेल्या पैशातून संशयितांनी मौजमजेसाठी एक महागडी यामाहा दुचाकी आणि आयफोन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

९ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ हेमंत अहिवळे, आदित्य विनोद कांबळे (दोघे रा. फलटण), रुद्र ऊर्फ शिरीष मंगेश सकुलकर (रा. माळशिरस) आणि सोने खरेदी करणारा तुषार जितेंद्र शहाणे (रा. बारामती) या संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ४३ हजार रुपयांची सोन्याची गोळी, २ लाख २१ हजारांची दुचाकी, एक लाख रुपये रोख आणि ४९ हजारांचा आयफोन असा एकूण ९ लाख १३ हजार ४०१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Back to top button
Don`t copy text!