‘कोचिंग क्लास’च्या स्पर्धेतून पालकांची सुटका, विद्यार्थ्यांना आता मोफत ‘डिजिटल कोचिंग’ : पंतप्रधान मोदींची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा

दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२६ | नवी दिल्ली |
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मध्यमवर्गीय कुटुंबे, विद्यार्थी, क्रीडा आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पालकांवरील कोचिंग क्लासेसचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन डिजिटल कोचिंग उपलब्ध करून देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

लाल किल्ल्यावरील भाषणातील प्रमुख मुद्दे :
मोफत डिजिटल कोचिंग : कोचिंग क्लासेस मध्यमवर्गीय पालकांसाठी मोठा आर्थिक बोजा बनले आहेत. या स्पर्धेतून सुटका करण्यासाठी देशातील तज्ज्ञ शिक्षक आणि उपलब्ध डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग दिले जाईल.

१ कोटी तरुणांना ‘एआय’ प्रशिक्षण : आगामी वर्षात देशातील १ कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कौशल्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

२०३६ ऑलिम्पिक यजमानपद व टॅलेंट हंट : भारताला २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवायचे असून, त्यासाठी ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी गावपातळीवरून व्यापक ‘टॅलेंट हंट’ अभियान राबवले जाईल. (२०३० मध्ये भारत राष्ट्रकुल खेळांचेही आयोजन करणार आहे).

व्यसनमुक्त भारत अभियान : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून १०० आठवड्यांचा ‘नशा मुक्त भारत’ कार्यक्रम आखण्यात आला आहे.

‘शक्तीची सप्तधारा’ (विकसित भारताचे ७ स्तंभ) : पंतप्रधान मोदींनी पुढील ५ ते ७ वर्षांत भारताच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘सप्तधारा’ ही संकल्पना मांडली :

  1. उत्पादन : जागतिक मानकांनुसार खर्च, गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे.
  2. शेती आणि अन्न प्रक्रिया : कृषी क्षेत्राची क्षमता पूर्णपणे वापरणे.
  3. तंत्रज्ञान व नवीन संशोधन : ६ जी, क्वांटम आणि रोबोटिक्स क्षेत्रात भारताला केंद्र बनवणे.
  4. गती शक्ती : हाय-स्पीड रेल्वे, महामार्ग आणि जलमार्गांना मल्टी-मोडल लॉजिस्टिक्सने जोडणे.
  5. रक्षा शक्ती : हायपर-सॉनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि सायबर सुरक्षेत आत्मनिर्भरता.
  6. हरीत व नील अर्थव्यवस्था : हवामान बदलावर उपाय आणि किनारी पर्यटनाला चालना.
  7. सॉफ्ट पॉवर : योग, आरोग्यसेवा, गेमिंग, चित्रपट आणि कॉन्सर्ट इकॉनॉमीला प्रोत्साहन.

आर्थिक व पायाभूत क्षेत्रातील प्रगती :
शेतकर्‍यांना दिलासा : जगात युरियाची गोणी ३,००० ला मिळत असताना भारत सरकार ती शेतकर्‍यांना अवघ्या ३०० मध्ये उपलब्ध करून देत आहे.

रेल्वे व ऊर्जा : गेल्या १० वर्षांत रेल्वेचे १००% विद्युतीकरण पूर्ण झाले असून देशात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात आली आहे. तसेच सेमीकंडक्टर आणि खोल समुद्रातील खनिज शोधासाठी ८५,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुक्त व्यापार करार : भारत जगातील ४० देशांबरोबर मोफत व्यापार करारांवर काम करत असून लघू व मध्यम उद्योगांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

गेल्या १२ वर्षांत २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढल्याचा उल्लेख करत, २०४७ पर्यंत भारत निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!