पाटण-कराड मार्गावरील ब्रिटिशकालीन केरा पूल खड्ड्यात


स्थैर्य, पाटण दि. ३० : पाटण-कराड मार्गावरील पाटण येथील केरा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या पुलावरून दररोज पाटण येथे बैठकांसाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी ये-जा करतात. मात्र, पुलावर पडलेल्या खड्ड्यांकडे पाहण्याची तसदी ते घेत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. पुलावरून जड वाहनांची वाहतूक होताना खड्ड्यांमुळे वाहने जोरजोरात आदळतात. त्यामुळे धरणीकंप झाल्यासारखा पूल हादरतो. लोकप्रतिनिधींना केरा पुलाची खिळखिळी झालेली अवस्था दिसत नाही का एल अँड टी कंपनीला पाठीशी घालण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे का, असा संतप्त प्रश्‍न स्थानिक नागरिकांसह वाहनधारक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.

दरम्यान, सध्या या ब्रिटिशकालीन पुलाच्या लगत जोड पुलाचे नवीन काम सुरू असून संबंधित एल अँड टी कंपनीकडून या ब्रिटिशकालीन जुन्या पुलाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे धोका निर्माण होण्यापूर्वी पुलावरून होणार्‍या जड वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशीही मागणी जनतेतून केली जात आहे. कराड-चिपळूण या राज्य महामार्गावरील कोकणला जोडणारा पाटण येथील केरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल शंभरी ओलांडून सव्वाशीकडे गेला असताना देखील आज जनतेच्या सेवेत ताठ मानेने उभा आहे. अहोरात्र या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. 2003-04 साली त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केरा पुलाची दुरुस्ती करून पुलावर पादचारी मार्ग तयार केले होते. तद्नंतर मागील पंधरा वर्षात या पुलाची कोणतीही दुरुस्ती अथवा मजबुतीकरणाचे काम झाले नाही. दोन वर्षापूर्वी झालेल्या सावित्री नदीवरील महाड दुर्घटना वेळी राज्यातील ब्रिटिशकालीन सर्व पूल चर्चेत आले होते. यावेळी पाटण येथील केरा पुलाचे नाव देखील अग्रस्थानी होते. सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे फर्मान राज्य शासनाने काढले होते. मात्र केरा पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिट संदर्भात ङ्गतेरी भी चूप मेरी भी चूपफ हीच अवस्था आहे.

अशा परिस्थितीत केरा पुलावरून दिवसेंदिवस जड वाहनांची वाहतूक वाढली असताना पुलावरील रस्त्याची खड्ड्यांनी आणि डबर्‍यांनी चाळण झाली आहे. एक दोनदा पुलावरील डबरे मुजविण्याचा प्रयत्न झाला देखील, मात्र तो तात्पुरत्या काळासाठीच राहिला. सध्या या पुलावरील रस्त्याची अवस्था डबरे आणि खड्ड्यांनी बिकट झाली आहे. पुलावरून जड वाहतूक चालू असताना धरणीकंप झाल्यासारखा पूल हादरतो. या सततच्या व वाहतुकीच्या हादर्‍याने पुलाचे आयुष्मान कमी झाले आहे. तरी देखील बांधकाम विभाग अथवा लोकप्रतिनिधी यांचे पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष जात नाही हे दुर्दैव असून वेळीच पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

ब्रिटिश शासनाकडून ग्रामपंचायतीला पत्र..केरा पुलावरील ब्रिटिशकालीन पुलाला सव्वाशे वर्ष होवून गेले असून हा पूल वापरण्यास कालबाह्य झाला आहे अशा आशयाचे ब्रिटिश शासनाकडून पाटण ग्रामपंचायतीला पंधरा ते वीस वर्षापूर्वीच पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर या पुलाची तकलुबी दुरुस्ती करून तो वाहतुकीस उपलब्ध ठेवण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!