

नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नाशिक केंद्र फलटणच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळा परिसरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा आणि ‘शक्ती कायद्या’ची अंमलबजावणी करण्याची मागणी.
स्थैर्य, फलटण, दि. ४ मे : नसरापूर (ता. भोर) येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नाशिक केंद्र, फलटणच्या वतीने शहरातील शंकर मार्केट परिसरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करत, “त्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी; अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावे, त्याचा योग्य तो बंदोबस्त आम्ही करू,” असा एकमुखी नारा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
छत्रपती शिवरायांच्या कायद्याची आठवण:
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात निषेध नोंदवताना मान्यवरांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे रांजाच्या पाटलाचा चौरंग करून कठोर शिक्षा दिली होती, तशीच कडक शिक्षा या नराधमाला देण्यात यावी. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला तातडीने कडक शासन करावे. आजकाल समाजातील संवेदनशीलता संपत चालली असून, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
या निषेध आंदोलनासाठी फलटण शहरातील विविध मान्यवर, व्यापारी वर्ग, सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शक्ती कायद्या’ची अंमलबजावणी करण्याची मागणी:
समाजात महिला व बालिकांवर वारंवार घडणाऱ्या अशा अमानुष घटनांना कायमचा पायबंद घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना तातडीने कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यात प्रलंबित असलेल्या ‘शक्ती कायद्याची’ तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
