कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या पती-पत्नीला वाचवणाऱ्या गोविंद बोडरे यांचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सन्मान


स्थैर्य, फलटण, दि. 4 मे : फलटण-पंढरपूर पालखी मार्गावर रावरामोशी पुलाजवळ कॅनॉलमध्ये कोसळलेल्या इनोव्हा गाडीतील पती-पत्नीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवणाऱ्या गोविंद बोडरे यांचा त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज (दि. ४ मे) विशेष सत्कार करण्यात आला.

फलटण-पंढरपूर पालखी मार्गावरील रावरामोशी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारी एक इनोव्हा गाडी नियंत्रण सुटून निरा उजव्या कॅनॉलमध्ये कोसळली होती. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली, मात्र अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

याच वेळी गिरवी येथील आणि सध्या मुंजवडी येथे वास्तव्यास असलेले गोविंद दिलीप बोडरे हे आपल्या गावी जात होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यानंतर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता थेट कॅनॉलमध्ये उडी घेतली.

पाण्यात बुडणाऱ्या गाडीची काच फोडून बोडरे यांनी सर्वप्रथम पतीला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पत्नीला बाहेर काढताना ती भीतीने बोडरे यांना घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र प्रसंगावधान राखून बोडरे यांनी त्या महिलेला आपल्या पाठीवर घेतले आणि प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून तिला सुखरूप बाहेर आणले. सुखरूप बाहेर आल्यानंतर ती महिला रडू लागली आणि म्हणाली, “आज आम्ही आमच्या मुलांनाही सोबत घेणार होतो, पण ते घरीच राहिले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.”

विशेष म्हणजे, हे धाडसी कार्य करून पती-पत्नीचे प्राण वाचवल्यानंतर गोविंद बोडरे कोणताही गाजावाजा न करता शांतपणे तिथून निघून गेले होते.

गोविंद बोडरे यांच्या या निःस्वार्थ आणि धाडसी कार्याची दखल घेत, आज (दि. ०४ मे २०२६) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, फलटण येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी (सातारा) श्री. दशरथ वाघुले यांच्या आदेशानुसार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (फलटण) श्री. संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (सहा. मो. वा. नि.) श्री. अमित रोकडे, श्री. योगेश मोरे, तसेच कनिष्ठ लिपिक श्री. सागर साळुंखे आणि श्री. करण ठोंबरे उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यासाठी श्री. उमाकांत दीक्षित आणि श्री. सनी पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

बोडरे यांच्या या शौर्याचे आणि माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!