तरुणांनो,प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या : प्रा. लक्ष्मण जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । बारामती । मुलीने प्रेमात नकार दिला म्हणून मुलींवर जीवघेणा हल्ला करणे, किंवा तिचा खून करणे. नकार पचवता आला नाही तर स्वतः हा आत्महत्या करणे.हल्ली अशा घटना घडताना आपणांस दिसून येतात.एखाद्या मुलीने नकार दिला म्हणून तिच्या जीवावर उठणे. तिला कायमचे संपवून टाकणे असा सैतानी विचार मुलांच्या मनात येतोच कसा हा मोठा प्रश्न आहे.दुसऱ्या चा जीव घेण्याचे धाडस होतेच कसे ? कायद्याचा धाक आहे की नाही ? मुले इतकी क्रूर किंवा हिंसक कशी बनतात ? मनात कायद्याची भीती येते की नाही ? असा गुन्हा करुन साध्य काय होते ? आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव तर जातोच पण स्वतः ला ही तुरुंगात जावे लागते याचा विचार आजची युवापिढी करत नाही.आपले अनमोल आयुष्य आपल्या हाताने उध्वस्त करणे म्हणजे विचारांचा अपरिपक्वपणा असल्याचे व्याख्याते प्रा लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

पेन्सिल चौक येथील आयोजित संवाद विचारांचा या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी बारामती शहर आणि तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व विद्या कॉर्नर इमारत मधील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज सोशल मिडियामुळे जग जवळ आले आहे.किशोरवयीन किंवा महाविद्यालयीन मुले मुली शिक्षण घेण्याच्या वयात एकमेकांच्या प्रेमात पडतात.समोरच्या मुलीचा नकार असेल तरी तिच्यावर हो म्हणण्यासाठी जबरदस्ती करतात. तिला होकार द्यायला भाग पाडतात.शाळा महाविद्यालयात जाताना मुलींना त्रास देतात.त्यांचा पाठलाग करतात.याला प्रेम म्हणत नाहीत.ही मनाची विकृती असते.प्रेम हे जबरदस्तीने मिळवता येत नाही. प्रेमाविषयीच्या चुकीच्या कल्पना मनात रंगविल्याने असे नको ते प्रकार घडतात.या वयात मुला- मुलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होतात.त्यामुळे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते.ती व्यक्ती आवडू लागते.त्या व्यक्तीशी सतत बोलू वाटते.आवडणा-या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याची भावना मनात निर्माण होते.हे खरं प्रेम नसते तर शारीरिक आकर्षण असते.

यातून मुलीच्या मागे पळणे ,त्यांना त्रास देणे,मुलींचा होकार मिळविण्यासाठी चुकीच्या गोष्टी करणे असे प्रकार मुले करतात. एखाद्या मुलीने प्रेमास नकार दिला की मुलाला ते सहन होत नाही.मनाला प्रचंड दुःख होते.तो नकार पचविणे अवघड जाते.मनावर खूप मोठा आघात होतो.मन नैराश्येच्या गर्तेत जाते.मनात सूडाची भावना बळावते.आणि यातून मग असे प्रकार घडतात.

प्रेम हे जबरदस्तीने मिळविता येत नाही.ती एक मनाची सहज सुंदर भावना आहे.एकमेकांच्या आवडी ,विचार जुळले तर मनात प्रेम निर्माण होते.

शिक्षण घेण्याच्या वयात मुले प्रेमात पडतात.एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात.आईवडीलांचा विचार करत नाहीत.फक्त प्रेम करुन पोट भरत नाही.जगण्यासाठी पैसाही लागतो.तो मिळवण्यासाठी चांगले शिक्षण घ्यावे लागते.नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो.प्रेमात पडल्यावर या गोष्टींचा विसर पडतो.चुकीची वाट निवडली जाते.असे भावनेच्या भरात घेतेलेले निर्णय आयुष्यभर पश्चात्ताप देतात.

तरुणांनो प्रेमाचा अर्थ नीट समजून घ्या.चित्रपटात दिसणारे प्रेम हे खरे नसते. ते फक्त नाटक असते. .तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे कळलेले नसते.वयाच्या या टप्प्यात आपले प्राधान्य शिक्षणास असायला हवे. शिक्षण उत्तम घ्या.स्वतःच्या पायावर उभे रहा.नोकरी ,शेती, उद्योग, व्यवसाय करा.आणि सुंदर आयुष्य जगा.

प्रेम ही एक सहजसुंदर भावना आहे.तुम्ही आपल्या आईवडीलांवर प्रचंड प्रेम करा. प्रेम करा मातृभूमीवर. प्रेम करा देशावर.

ज्या वयात शिक्षण घेऊन आयुष्य घडवायचे असते त्याच वयात तुम्ही प्रेमात पडला तर आयुष्याचं जहाज भरकटू शकते.अनेक वादळांना सामोरे जावे लागते.तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊन आयुष्य मातीमोल करु शकता.

तुमच्या स्वतः वर आधी प्रेम करा.तुमचे प्रेमाविषयीचे विचार बदला.आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवा आभार शुभम बालगुडे यांनी मानले तर सूत्रसंचालन ताराराम देवासी यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!