सातारा शहरातील 51 गणेश मंडळांच्या मूर्तींचे आज विसर्जन


स्थैर्य, सातारा, दि. 31 : बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर दहा व अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविक तसेच गणेशोत्सव मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने सातारा पालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. बुधवार नाका येथील तळ्यावर पालिकेच्या बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज असून दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी तब्बल शंभर टनी हायड्रोलिक क्रेनचा उपयोग केला जाणार आहे.

बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेकडून 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 12 मीटर खोलीचे कृत्रिम तळे उभारण्यात आले आहे. या तळ्यात तब्बल 55 लाख लीटर पाणी मावते. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे या तळ्यात विसर्जन केले जाते. यंदा विसर्जनासाठी शहरातील जवळपास 90 मंडळांची पालिकेकडे नोंदणी केली आहे. मात्र, सोमवारी आयुर्वेदिक गार्डन येथे तीन व बुधवार नाका येयील तळ्यावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवघ्या तीन गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जित झाल्या.

या तळ्यात पाणीसाठा करण्यात आला असून, सुरक्षेसाठी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. या शिवाय वीजेची व्यवस्था करून मचाणही उभारण्यात आले आहे. यंदाही विसर्जनासाठी शंभर टन वजनाची हायड्रोलिक क्रेन पुण्याहून मागवली जाणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनासह पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विसर्जनासाठी मंडळाच्या केवळ पाच सदस्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तळ्यावर गर्दी होऊ नये, यासाठी विसर्जनावेळी गणेशाची आरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांना विसर्जनाला घेऊन येण्यापूर्वीच पूजा-अर्चा करावी लागणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!