

फलटण तालुक्यात शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ११ ते १७ मे दरम्यान ‘भगवा सप्ताह’ राबवून १०० नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी बीएलए नियुक्त्यांवरही भर.
स्थैर्य, फलटण, दि. 3 मे : तळागाळापर्यंत शिवसेना पक्ष पोहोचवण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात आणि वस्तीवस्तीवर नवीन शाखा सुरू करण्याचे धोरण पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यात येत्या ११ ते १७ मे या कालावधीत ‘भगवा सप्ताह’ राबवून तब्बल १०० नवीन शिवसेना शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांनी दिली. फलटण येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतदार यादी अद्ययावतीकरण व ‘बी.एल.ए.’ नियुक्तीत माढा आघाडीवर:
सध्या मतदान याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (SIR) काम सुरू असून, शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेकडून बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात ही जबाबदारी पूर्ण झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघ या प्रक्रियेत आघाडीवर असल्याची माहिती पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.
फलटण-कोरेगाव मतदारसंघासाठी विराज खराडे यांची ‘बी.एल.ए. १’ (BLA-1) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पुढील नियुक्त्यांचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. कोणताही पात्र मतदार यादीतून वगळला जाऊ नये, याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जाईल, असे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
‘संजीवराजेंमुळे शिवसेनेला दहा हत्तींचे बळ’:
सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी अत्यंत वेगाने केली जात आहे. “येत्या काळात सातारा जिल्ह्यात ५ ते ६ आमदार आणि इथले दोन्ही खासदार शिवसेनेचेच झाले पाहिजेत,” हा मुख्य विचार घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करत असल्याचे पै. चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि नेतृत्वामुळे फलटण व परिसरात शिवसेनेला ‘दहा हत्तींचे बळ’ मिळाले असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील, शिवसेना नेते पै. संतोष (आबा) वेताळ, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने आता अत्यंत आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे या ‘भगवा सप्ताह’ आणि पक्षबांधणीच्या नियोजनावरून स्पष्ट दिसून येत आहे.
