नितेश राणेंची पोलिसांना अरे-तुरे : असं काही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही – आयजी सुनील फुलारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२४ | सातारा |
वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करणार्‍या व पोलिसांना अरे-तुरे करणार्‍या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का? या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. असं काही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही, असे सांगत त्यांनी आपली हतबलता स्पष्ट केली.

भाजप आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तणाव वाढवत आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, म्हणून नोटीस द्यायला गेल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांचा एकेरी भाषेत उध्दार करून बदलीची धमकी देत आहेत. या प्रकरणी आमदार नितेश राणेंवर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला असता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली.

सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे हे पोलिस अधिकार्‍यांना वारंवार बदल्यांची धमकी देत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, यासंदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट बोलणे टाळले. जे काही घडले, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

इस्लामपूर (ता. वाळवा) येथे २४ ऑगस्ट रोजी आमदार राणेंनी पोलिस निरीक्षक हारूगडे यांना एकेरी भाषा वापरली. प्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करू नये, म्हणून पोलिस निरीक्षक हारूगडे हे आमदार राणेंना नोटीस देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ’तू कोणाला नोटीस देतोयस, त्या मुस्लिमांना नोटीस दे. मी नोटीस घेत नाही. तिकडे फेकून दे’, अशा एकेरी भाषेत आ. राणेंनी पोलिस निरीक्षकाला सुनावले होते. त्यासंदर्भातील प्रश्नावर मी त्याबद्दल ’ऑफ द रेकॉर्ड’ बोलू शकतो, परंतु, मीडियासमोर काहीही बोलणार नाही, अशी हतबल प्रतिक्रिया आयजी सुनील फुलारी यांनी दिली.

पोलिसांना जाहीर कार्यक्रमांमध्ये वारंवार धमक्या देणार्‍या आ. नितेश राणेंचा सातार्‍यातील सेवानिवृत्त पोलिसांच्या संघटनेने जाहीर निषेध केला आहे. पोलिस कधीही बदलीला घाबरत नाहीत. आकसापोटी पोलिसांच्या बदल्या करणार्‍यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही संघटनेनं केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!