….. तर फलटणला लाभतील दोन खासदार; राजकीय वर्तुळात चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२३ | फलटण | लोकसभा निवडणुका या अगदी आता एका वर्षावर येऊन ठेपलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आता कंबर कसलेली दिसत आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणता उमेदवार सक्षमपणे चालेल यासाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांची चाचपणी सुरू झालेली आहे. राजकीय गणिते फिट बसली तर फलटण तालुक्याला दोन खासदार लाभतील; अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आता लोकसभेवर पाठवण्यासाठी सूचक असे विधान केलेले होते. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा अनुमोदन देत श्रीमंत रामराजेंनी आता जिल्ह्यासाठी राहिलेली विकास कामे ही केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी लोकसभेवर जाणे गरजेचे आहे; असे सुतोवाच केले होते. त्यामुळे रामराजेंना लोकसभेवर पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतिकूल असल्याचे दिसून येत आहे.

 

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे श्रीनिवास पाटील करीत आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता व इतर राजकीय समीकरणांचा विचार करता त्यांनाच पुन्हा तिकीट मिळेल अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. लोकसभेला झालेल्या पराभवाचा विचार करता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सुद्धा पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना सातारा लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यास सांगू शकते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अशी निवडणूक झाल्यास निवडणूक अत्यंत चुरशीची होईल.

यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध कामांच्या माध्यमातून आपला एक वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. खुद्द शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळवून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झालेले होते. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकास कामांचा धडाका लावत माढा लोकसभा मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून यावा; यासाठी केंद्र व राज्य सरकारमधील विविध मंत्री हे वारंवार माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्याची पद्धत पाहता भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये त्यांना पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.

जर राजकीय फासे पडले तर फलटण तालुक्याला नक्कीच दोन खासदार लाभतील अशा चर्चा सध्या फलटण शहरासह तालुक्यांमध्ये सुरू आहे.

 


Back to top button
Don`t copy text!