
आहारातील साध्या मिठातील अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब वाढत असून आयसीएमआरने नेहमीच्या टेबल सॉल्टऐवजी लो-सोडियम मिठाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० सप्टेंबर : राज्यातील तसेच देशातील नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब (Hypertension) आणि हृदयविकाराचा धोका वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आहारातील मिठाच्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या साध्या टेबल सॉल्टऐवजी पोटॅशियमयुक्त किंवा लो-सोडियम मिठाचा पर्याय स्वीकारल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त सोडियम ठरतेय धोकादायक
भारतात बहुतांश नागरिक दैनंदिन आहारात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवून दिलेल्या ५ ग्रॅम प्रमाणापेक्षा दुप्पट म्हणजेच ८ ते ११ ग्रॅम मिठाचे सेवन करतात. साध्या मिठात असणारे जास्त सोडियम आणि शरीरातील पोटॅशियमची कमी पातळी यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येऊन रक्तदाब वाढतो. या तणावामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
पोटॅशियमयुक्त पर्याय आणि आरोग्यदायी फायदे
लो-सोडियम मिठात साधारणपणे ७० ते ७५ टक्के सोडियम क्लोराईड आणि २५ ते ३० टक्के पोटॅशियम क्लोराईड असते. हे मीठ जेवणाची चव न बदलता शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करते आणि पोटॅशियमची पातळी वाढवून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने या पर्यायाचा विचार करावा, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.