
थेट WhatsApp वर मिळवा
विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला असून, आता विवाह प्रमाणपत्र थेट डिजिलॉकरवर डाउनलोड करता येणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सोयीची व्हावी, यासाठी राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने विवाह नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीचे डिजिलॉकरशी यशस्वी एकत्रीकरण केले आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना आता विवाह नोंदणीचे अधिकृत आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र थेट डिजिलॉकरवर पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
ऑनलाइन प्रणालीचे एकत्रीकरण आणि आकडेवारी
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामार्फत विशेष विवाह अधिनियम, १९५४ अंतर्गत आणि इतर नियमांनुसार विवाहांची नोंदणी करून प्रमाणपत्रे तयार केली जातात. २७ मे २०२३ पासून विवाह नोंदणीची सर्व कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. विभागाचे सहमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकूण १ लाख ८ हजार २५८ विवाह प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये विशेष विवाह प्रक्रियेतील ८७ हजार ३२६ आणि पूर्वीच्या विवाह नोंदणीतील २० हजार ९३२ प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
कार्यालयात जाण्याची गरज नाही
पूर्वी प्रमाणपत्राची प्रत मिळवण्यासाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या, मात्र आता या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. २०२३ मध्ये ७,८८८, २०२४ मध्ये ३१,९३६, २०२५ मध्ये ३५,०९५ आणि २०२६ मध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत ३३,३३९ प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे जतन करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





