खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार : देवेंद्र फडणवीस


स्थैर्य, मुंबई, दि. ०४ : राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे. उणे 30 डिग्री तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो आहोत, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. वीर सावरकर यांच्याबाबत ही टिपण्णी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. यातूनच त्यांचे सावरकरप्रेम दिसून येते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात ते जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. शारजिलबाबत बोलण्याची त्यांची हिंमत नाही. तो पुण्यात येतो, हिंदूंना सडका म्हणून जाण्याची त्याची हिंमत होते. पण, त्याला पकडण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. शिवसेना स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, हे त्यांनी सांगितले हे बरेच केले. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठावूक नसावे. भाजपाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले, असे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण सुद्धा दिशाहिन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही.


Back to top button
Don`t copy text!