निंबळक: रस्ते विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर – मोठा दिलासा


राम निंबाळकर यांच्या प्रयत्नातून निंबळक येथील रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी पूर्ण केली आहे.

स्थैर्य, निंबळक, दि. 08 जून : राम निंबाळकर यांच्या अथक पाठपुराव्यामुळे निंबळक गावातील रस्ते विकासाला मोठी गती मिळाली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून गावासाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रस्त्यांची होणार सुधारणा

मंजूर झालेल्या निधीतून गावातील तीन प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये इरिगेशन बंगला ते वाजेगाव या एक कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश आहे. तसेच कॅनल ते बोडकेवस्ती आणि निंबळक नाका ते बाबा ढाबा या दोन्ही रस्त्यांचे प्रत्येकी ७५ लाख रुपये निधीतून काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

अधिकाऱ्यांकडून पाहणी पूर्ण

मंजूर झालेल्या या कामांची तांत्रिक पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे आणि शाखा अभियंता तुषार शिंदे यांनी निंबळक गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तिन्ही रस्त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत कामाचे नियोजन केले.

कामाची गुणवत्ता राखून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राम निंबाळकर यांनी केलेल्या या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.


Back to top button
Don`t copy text!