दैनिक स्थैर्य | दि. 16 डिसेंबर 2023 | फलटण | सर्वसामान्य नागरिकांना परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावी, आवड वृद्धिंगत व्हावी, संत संगती, ग्रंथवाचन, श्रवण व नामचिंतन घडावे या हेतूने सोनगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सोनगाव बंगला येथील ननावरे बंधू यांच्या माऊली शेती फार्म या ठिकाणी उत्साहात करण्यात आले होते. या सप्ताह मध्ये विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तनाची सेवा घडली आहे. त्यामध्ये ह. भ. प. विश्वास आप्पा कोळेकर, ह. भ. प. सतीश महाराज खोमणे, ह. भ. प. प्रकाश महाराज पवार, ह. भ. प. प्रल्हाद जाधव महाराज, ह. भ. प. बंकट महाराज ढवळे यांचा समावेश होता.
या अखंड हरिनाम सप्ताहाचा आरंभ रोजी झाला व तसेच समारोप पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्त, तरुण मंडळ व ग्रामस्थ मनोभावे सहभागी झाले होते. माऊली फार्म पासुन दिंडी सुरुवात होऊन ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर, हनुमान मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिर भेट घेऊन परत सप्ताह ठिकाणी पोहचली. सिद्धनाथ मंदिर परिसरात या दिंडीचे स्वागत सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ यांचे कडून जल्लोषात करण्यात आले.
यामध्ये गावातील पती पत्नी जोडप्यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत व पूजन करून हा सोहळा अविस्मरणीय करण्यात आला. जोडप्यानी शिस्त राखत दिंडी सोहळ्याचे पूजन केले. वारकरी संप्रदाय व गावातील सर्व तरुण मंडळ एकत्र येऊन सर्व परिसर भक्तमय झाला. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . दिंडी सोहळ्यात कु रुद्र आडके याने संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभिरुप साकारले होते.
सर्व जोडप्यांनि व वारकरी मंडळींनी कीर्तन, भजनांचा जयघोष करत, फुगडी खेळून आनंद साजरा केला. गावातील प्रमुख रस्ते स्वच्छ ,सुशोभित करण्यात आले होते. सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून स्वागत केले. सर्व तरुण मंडळ सोनगाव , विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, चैतन्य राम जप संकुल सोनगाव व ग्रामस्थ यांनी दिंडी सोहळ्याचे संयोजन केले. सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भक्त भाविक, तरुण मंडळ यांनी एकत्र येऊन गावातील संस्कृती जपत वातावरण भक्तिमय केले.