श्री जितोबा विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विद्यार्थी समाजात ताठ मानेने उभा राहिला पाहिजे यासाठी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय, जिंती (तालुका फलटण) येथे दप्तराचे ओझे कमी करून विद्यार्थांना आनंददायी शिक्षण मिळावे म्हणून ‘आनंददायी शनिवार’ दर आठवड्याला साजरा केला जातो.

या आठवड्यात महावाचनअंतर्गत ‘कवी आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम, वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड ही चळवळ अधिक गतिमान व्हावी म्हणून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विविध देशी झाडांच्या बिया व पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

कर्मवीर विद्या प्रबोधिनी, करिअर गायडन्सअंतर्गत वन विभागातील करिअरच्या संधी, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता व परीक्षा पद्धती याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर, वाचन व क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम, ग्लोबल अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, सर्पमित्र मंगेश कर्वे तसेच अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री. ताराचंद्र आवळे होते.

यावेळी राहुल निकम म्हणाले की, निसर्ग संवर्धन हा आपला श्वास व सोबती बनला पाहिजे. पर्यावरणातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी वन विभाग सतत आपल्या सेवेस तत्पर आहे. झाडे लावून ती जगवली पाहिजेत, नुसती झाडे लावली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही.

यावेळी त्यांनी वन विभागातील नोकरीच्या संधी व त्यासाठी आवश्यक बाबी याविषयी माहिती व कवितांद्वारे मार्गदर्शन केले.

सचिन जाधव म्हणाले की, छोट्या किटकांपासून ते महाकाय प्राण्यांपर्यंत, महाकाय वृक्षांपर्यंत पर्यावरणातील घटकांना आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे. वृक्ष लागवड ही चळवळ झाली पाहिजे. पर्यावरणातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे, त्यामुळेच प्रत्येक घटकाचे अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे म्हणाले की, रयत शिक्षण संस्था व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन याद्वारे राबविण्यात येणार्‍या प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून या विद्यालयात आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना सक्षम केले जाते. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धती बदलत आहे याचा विचार करून आधुनिकतेचा ध्यास घेऊन शिक्षण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान याचा योग्य वापर केला जातो. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांची करिअरची दिशा ठरवली जाते त्यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करून त्यांची सुरक्षा व्यवस्था याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन समुपदेशक सौ. गौरी जगदाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ. विद्या जमदाडे यांनी मानले.

यावेळी उपशिक्षक प्रदीप माने, सौ. अर्चना सोनवलकर, सौ.शीतल बनकर, श्री. गोविंद खिलारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन धर्माधिकारी व राजेंद्र घाडगे यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!