‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । मुंबई । ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरे तर खूप मोठे असून हा उपक्रम राबविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हूराज बगाटे, विभागाचे अधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडक ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने लोकहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. ‘आनंदाचा शिधा’ चे वितरण हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवाळीत याचे वाटप केले तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता देखील गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत आहे. हा शिधा संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. १०० टक्के साहित्य जिल्ह्यांना पोहोचले आहे, यातील शिधा संचचे ७० टक्के लाभार्थ्यांनी उचल केली आहे. उर्वरित साहित्य वाटप करण्यात यावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडत आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची दुःख जाणून घेत आहोत. त्यासाठी प्रभावी उपाययोजना देखील करत झालेल्या नुकसानाचे पंचनामेदेखील करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहोत.  केंद्र सरकारच्या धर्तीवर असलेली पी. एम. किसान योजना तशीच राज्य शासनाने ही ‘नमो सन्मान’ योजनाही सुरू केली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी १८०० रुपये देत आहोत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आनंदाचा शिधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत एक कोटी ५८ लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आनंदाचा शिधा, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज लाभार्थ्यांना मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधता येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

‘आनंदाचा शिधा’ मुळे आनंद मिळाला – लाभार्थ्यांची प्रतिक्रिया

‘आनंदाचा शिधा’मुळे आम्हाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असून आमच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. कितीही रांगा असल्या, तरी शिवभोजन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अकोला, हिंगोली, ठाणे, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, मुंबई शहर व मुंबई उपनगर, जळगाव या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. तसेच या योजनांच्या बाबतीत जिल्हास्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.

प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते”आनंदाचा शिधा” संचाचे वितरणही लाभार्थ्यांना यावेळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!