ज्ञानपर्वाचा सूर्यास्त…


वारकरी संप्रदायातील अधिकारी, अभ्यासू किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या निधनाने संप्रदायाचीच नव्हे तर मराठी सारस्वताची फार मोठी हानी झाली आहे. त्यांना श्रध्दांजली वाहताना मन कासावीस होते. बाबामहाराज म्हणजे संत साहित्याचा चालता-बोलता ज्ञानकोष होते. आपल्या विद्वत्तापूर्ण निरूपणाने आणि सुमधुर प्रासादिक वाणीने त्यांनी कीर्तन परंपरेला नवा साज चढवला. खेड्यापाड्यातील अशिक्षित महिला शेतात व घरात चुलीपुढे बाबामहाराजांनी गायलेला हरिपाठ सहजपणे गुणगुणतात, हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. “तैसे साच आणि मवाळ| मितुले आणि रसाळ| शब्द जैसे कल्लोळ| अमृताचे॥” या संत ज्ञानदेवांच्या आत्मानुभवाचा उत्कट अविष्कार बाबामहाराजांच्या किर्तनातून महाराष्ट्राने अनुभवला. बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे योग्याची समाधी, भक्तीप्रेमाचे सुख आणि संगीतातला अलंकार होते.

आध्यात्मातील थोर विभूतीपुरूष स्व. दादामहाराज सातारकरांचा वसा व वारसा बाबामहाराजांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला. बाबामहाराजांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. संतविचारांचे इंग्रजीतून निरूपण करण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्राची कीर्तन परंपरा बाबामहाराजांनी सातासमुद्रापार विदेशात पोहोचवली. इंग्लंड, अमेरिका व अनेक देशात त्यांची किर्तने झाली. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या मुंबईतील माधवबाग परिसरात सातारच्या दोन संतांनी आध्यात्मिक मठ स्थापन केले. त्यातील एक बाबामहाराज आणि दुसरे दत्तात्रय कळंबे महाराज. सातारकर म्हणून आपल्याला याचा अभिमान वाटतो. बाबामहाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिध्दीसाठी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांची मूळ चाकोरी कधीही सोडली नाही. मानवता, विश्वात्मक भूमिका, अंधश्रध्दा निर्मूलन, पुरोगामीत्व या वारकरी तत्वांपासून ते कधी भटकले नाहीत. बाबामहाराज सातारचे असल्यामुळे अपल्याला विशेष कौतुक वाटत असले तरी अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला ते अत्यंत प्रिय होते. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एका ज्ञानपर्वाचा सूर्यास्त झाला.

महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली !!

– राजेंद्र शेलार, सातारा
विश्वस्त, ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे सांप्रदायिक मंडळ, आळंदी


Back to top button
Don`t copy text!