महापुरुषांना जातीत न विभागता त्यांचे विचार अंगीकारा! इंजिनिअरिंग कॉलेज फलटणमध्ये बाबासाहेब जगताप यांचे प्रबोधन


इंजिनिअरिंग कॉलेज फलटण येथे ‘महापुरुषांचे देशासाठी योगदान’ या विषयावर बाबासाहेब जगताप यांचे व्याख्यान संपन्न. यावेळी त्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक कार्यावर सखोल प्रकाश टाकला.

स्थैर्य, फलटण, दि. 17 एप्रिल : महापुरुषांना केवळ जाती-जातीमध्ये विभागण्याऐवजी ते संपूर्ण समाजाचे आणि देशाचे आहेत, ही व्यापक भावना आजच्या तरुण पिढीने जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयु. बाबासाहेब दिलीप जगताप यांनी केले. ते इंजिनिअरिंग कॉलेज, फलटण येथे आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते.

बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी इंजिनिअरिंग कॉलेज फलटण येथे “महापुरुषांचे देशासाठी योगदान” या विषयावर आयु. बाबासाहेब दिलीप जगताप यांचे अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मनोजकुमार दळवी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल (चव्हाणवाडी) चे मुख्याध्यापक आयु. विठ्ठल निकाळजे सर उपस्थित होते. तसेच, आयु. आनंद जगताप यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या संघर्षाचा जागर:

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात बाबासाहेब जगताप यांनी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. महात्मा फुले यांनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य सांगताना, त्यांनी देशातील मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून असलेले अतुलनीय योगदान त्यांनी अधोरेखित केले. तसेच, तत्कालीन अनिष्ट सतीप्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुलेंनी नाभिक समाजाचा घडवून आणलेला ऐतिहासिक संप याची आठवणही त्यांनी विशद केली.

डॉ. बाबासाहेबांचे देशासाठीचे योगदान:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडताना त्यांनी बाबासाहेबांच्या बालपणापासून ते शिक्षणापर्यंतचा संघर्षमय प्रवास मांडला. साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमधील त्यांचे प्राथमिक शिक्षण, देशाच्या भक्कम आर्थिक प्रगतीसाठी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) स्थापनेमागील त्यांचा दूरदृष्टीचा विचार त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. याशिवाय सामाजिक समतेसाठी केलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यांसारख्या चळवळींचे महत्त्व स्पष्ट करत, महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर त्यांनी विशेष भर दिला.

सदर व्याख्यानातून महापुरुषांचे खरे विचार आणि त्यांचे देशाप्रती असलेले योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

मान्यवरांचे आभार व संयोजन:

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन इंजिनिअरिंग कॉलेज फलटणचे समन्वयक श्री. अमोल खेसे सर यांनी केले होते. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन सौ. प्रतीक्षा भोसले मॅडम यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार सौ. आशा दुधाळ मॅडम यांनी मानले. या व्याख्यानास महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!