अन्यथा ३० एप्रिलला लाँग मार्च काढणार; १०५ गावांतील शेतकऱ्यांचा कोल्हापूरवर धडकणार मोर्चा, डॉ. भारत पाटणकरांचा इशारा


गुढे-पांचगणी-येवती उपसा सिंचन योजनेला तांत्रिक मंजुरी व निधीची लेखी हमी न मिळाल्यास, कराड, शिराळा व पाटणमधील शेतकरी ३० एप्रिलला वारणा धरणापासून कोल्हापूरवर ‘लाँग मार्च’ काढणार असल्याचा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १६ : कराड आणि शिराळा तालुक्याला वरदान ठरणारी ‘गुढे-पांचगणी-येवती उपसा सिंचन योजना’ मार्गी लावण्यासाठी शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. या योजनेला नाशिकची तांत्रिक मंजुरी आणि शासनाने निधी उपलब्ध केल्याचे लेखी पत्र येत्या २९ एप्रिलपर्यंत दिले नाही, तर ३० एप्रिल रोजी शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ गावांतील शेतकरी वारणा धरणापासून कोल्हापूर येथील कृष्णा खोरे कार्यालयावर मोर्चाने चालत जाणार आहेत, असा खणखणीत इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ वंचित गावांच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, तानाजी पाटील, वसंत पाटील, शंकर मोहिते, शिवाजी पाटील, बाळासाहेब माने, उदय पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील, बाबासो पवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

२९ एप्रिलची ‘डेडलाईन’ अन् ३० एप्रिलला लाँग मार्च

या योजनेसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. मंत्रालयात तसेच पुणे, कोल्हापूर, कृष्णा खोरे कार्यालयात बैठका आणि सततच्या पाठपुराव्यानंतर आता अनेक कामे मार्गी लागली आहेत.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “आता नाशिकची आराखड्यास तांत्रिक मंजुरी मिळावी व राज्य शासनाकडून निधीची लेखी हमी मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासाठी निधीला मंजुरी मिळाल्याचे तोंडी सांगितले जात आहे, पण यावर आमचा विश्वास नाही. अधिकारी पातळीवर २९ एप्रिलपर्यंत लेखी हमी न मिळाल्यास, या भागातील शेतकरी आणि शेतमजूर दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वारणा धरणापासून थेट ‘लाँग मार्च’ने कोल्हापूरला जातील.”

अंतिम यश मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार

या मेळाव्यात हणमंतराव पाटील, बाळासाहेब माने, सखाराम पाटील, उदय पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सुरेश पाटील, संचालक शिवाजी पाटील, सुनील शिंदे, एकनाथ मोहिते यांनीही आपले विचार मांडले. डॉ. भारत पाटणकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली उभारलेला हा लढा जोपर्यंत अंतिम यश मिळत नाही, तोपर्यंत असाच सुरू राहील, असा निर्धारही उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!