“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । मुंबई । अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एप्रिल, मे महिन्यात मोठा फटका बसला. कडधान्य, फळपीके व भाजीपाला तसेच इतर मालमत्तांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी घोषणा केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत केली. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.

गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई राज्य सरकार देणार, अशी घोषणा केली होती. मदतीसाठी २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एनडीआरएफच्या निकषानुसार एक हेक्टरसाठी ६८०० रुपये नुकसान भरपाई दिली जाते ती दुप्पट करु असे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र, दुर्दैवाने तो निर्णय अद्याप लागू करण्यात आलेला नाही, याकडे आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले व त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. राज्यातील दरडप्रवण जागांबाबत माळीण दुर्घटनेनंतर सरकारने यादी बनवली होती त्यावर पुढे काहीच झाले नाही, याकडे सत्यजित तांबे यांनी लक्ष वेधले.

त्याबाबत सरकारने काय कार्यवाही केली?

राज्यात मार्च, एप्रिल व मे २०२३ मध्ये झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर वरील कडधान्य, फळपिके व भाजीपाला  पिकांचे व मालमत्तांचे नुकसान झाले. सातारा जिल्हयातील फलटण, माण व पाटण तालुक्यातील मौजे दिवशी बुद्रुक या ठिकाणी तसेच फलटण शहरातील गिरवी आणि तरडफ, मराठवाडा, विदर्भ यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर येऊन तसेच गारपीटीमुळे विविध भागातील जनावरे दगावणे, पावसामुळे शेत जमिनीची प्रचंड धुप होऊन बांध बंदिस्ती अनेक ठिकाणी वाहून गेले. तसेच २५ व्यक्तींचा मृत्यू तर २९ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे मे महिन्यात समोर आले त्याबाबत सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे ९०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान 

अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट व वीज पडल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे ९०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून यापैकी २३ घरांची पूर्णत: पडझड झाली, १२३ घरांची अंशत: व ७७७ कच्च्या घरांचीही पूर्णत: पडझड झाली.  १८ जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले, विदर्भातील वर्धा, गडचिरोली, नागपूर, अकोला, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम व भंडारा  जिल्ह्यातील शेतपिके, गहू, हरभरा, संत्रा, आंबा, मोसंबींच्या फळबागांचे, भाजीपाला, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले.  नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, कळवण देवळा दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांतील ३७ हजार ९८१ हेक्टरवरील भाजीपाला कांदा, आणि फळपिकांचे नुकसान झाले, जळगाव जिल्ह्यांतील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांतील केळी, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले, लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण, औसा, रेनापुर, उदगीर, अहमदपूर, चाकूर या तालुक्यात ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरी पिकांचे नुकसान झाले तसेच अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, परभणीसह इतर जिल्ह्यांतील आंबा, केळी, पपई, द्राक्ष, संत्रा, मोसंबी फळपिके, भाजीपाला पिकांसह उन्हाळी बाजरी, ज्वारी, सोयाबीन, हळद पिकांचे नुकसान झाले आहे, याबाबत सरकारने काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता दिली

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, राज्यात मार्च ते मे या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे एकूण ३,०२,७०६.०७ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ९५ व्यक्तींचा व ९४६ जनावरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. मार्च ते मे मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके व मालमत्तेच्या नुकसानीकरीता द्यावयाच्या मदतीसाठी निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता दिली असून जिल्हानिहाय निधी वाटप झाल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!