कोरोना काळातील पोलीस पाटलांच्या कार्याकडे शासनाचे दुर्लक्ष : शांताराम काळेल


 

स्थैर्य, फलटण दि.१८ : फलटण: कोरोना काळात पोलीस पाटलांनी कोरोना विरुद्धची लढाई अत्यंत प्रामाणिकपणे लढली आहे. कोरोना काळात काम करणार्‍या विविध व्यक्तींना शासन पातळीवरुन ‘योद्धा’ म्हटले गेले आहे. अनेकांचा शासनाने विमा उतरवला, त्यांना प्रोत्साहन भत्ते दिले, सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिली. मात्र या कठीण काळात प्रामाणिकपणे काम करणारा पोलीस पाटील शासनाच्या नजरेतून दुर्लक्षीत राहिला आहे, अशी खंत फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांनी पोलीस पाटील दिनाच्यानिमित्ताने व्यक्त केली. 

17 डिसेंबर रोजी राज्यात पोलीस पाटील दिन साजरा केला जातो. या पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या एका संदेशात शांताराम काळेल – पाटील यांनी सर्व पोलीस पाटील सहकार्‍यांना शुभेच्छा देवून नमूद केले की, हे वर्ष पोलीस पाटलांसाठी अतिशय आव्हानाचे वर्ष होते. लॉकडॉऊन काळात गावोगावी पोलीस पाटलांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता मोठी कामगिरी बजावली. शासन यंत्रणेत काम करणार्‍या इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी बजावलेल्या सेवेची दखल शासनाने घेतली मात्र पोलीस पाटलांच्या कार्याची दखल शासनाने घेतली नाही. कोरोना काळात सर्व पोलीस पाटलांनी निपक्षपती व निर्भीडपणे केलेले कार्य निश्‍चितच अभिमानास्पद आहे, असेही शांताराम काळेल पाटील यांनी आपल्या संदेशात सांगीतले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!