सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका – पालकमंत्री बाळासाहेब पाटील


स्थैर्य, सातारा , दि. १५: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी 45 लाख 87 हजार 256 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी शासनानी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी 45 लाख 87 हजार 256 रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. या 38 सुसज्ज अशा रुग्णवाहिकांच्या माध्यातून कोरोना संसर्ग रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री यांचे विशेष आभार मानले आहेत.

7 डोंगरी व सर्वसाधारण 31 अशा एकूण 38 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. जिल्ह्याला रुग्णवाहिका मिळाव्यात यासाठी माझ्यासह वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रयत्न केले असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!