कोरोनावर मात करण्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा गरजेच्या – आ. शिवेंद्रसिंहराजे


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. कोरोना महामारी रोखणे हि काळाची गरज असून त्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे, असे मत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून सातारा जिल्हा परिषदेमार्फत सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर, ठोसेघर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. सातारा पंचायत समितीच्या आवारात या तीनही रुग्णवाहिकांचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य श्रीमती वनिता गोरे, सौ. मधू कांबळे, सौ. कमल जाधव, प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, उप सभापती अरविंद जाधव, सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, सौ. छाया कुंभार, गट विकास अधिकारी सौ. सुवर्णा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. स्वप्नील धर्माधिकारी, डॉ. रायबोले, डॉ. मेहता, डॉ. मानसी पाटील, डॉ. अरुण पाटोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर आणि ठोसेघर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या- त्या भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी या केंद्रांवर येत असतात. ठोसेघर हा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने तसेच लिंब आणि कण्हेर आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत आसपासची अनेक गावे येत असल्याने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका या तीनही आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ रुग्णांना होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.

आवश्यक तेवढा लस साठा उपलब्ध करा
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना कोरोनावरील लसींचा साठा कमी पडत असून प्रत्येक लसीकरण केंद्रावर आवश्यक असेल तेवढा लस साठा सातत्याने पुरवला पाहिजे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यासंदर्भात आपण पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी बोललो असून लस उपलब्धता आणि लसीकरण गतीने होण्यासंदर्भात चर्चाही केली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असे दोघांनीही सांगितल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!